पुणे- राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, २२ ते २५ दरम्यान, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. तर मुंबई आणि पुण्यात घाट विभागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यात २५ जूनपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडून ताशी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज २२ जून रोजी नैऋत्य मोसमी पावसाने विदर्भाचा उर्वरित भाग, मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगड, ओडीसाचा आणखी काही भाग व्यापला आहे. पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातील देखील मॉन्सूनने प्रगती केली आहे. तर पश्चिम बंगालमधील उपहिमालयीन पर्वतरांगांचा उर्वरित भाग व झारखंडच्या काही भाग मॉन्सूनने व्यापला आहे. उत्तरी सीमा अरबी समुद्रातील २०.५ उत्तर अक्षांश नवसारी, जळगाव, मांडला, पेंढरा रोड, जरसुगडा. बालासूर, हलदीया, कपूर, साहेब गंज आणि रॉकसल चक्रिय स्थिती असल्याने, तसेच त्याची वाटचाल ही येत्या तीन-चार दिवसात उत्तर अरबी समुद्रचा आणखी काही भाग, गुजरात महाराष्ट्राचा उर्वरित भाग, मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा पश्चिम बंगालमधील गंगेच्या खोऱ्याचा प्रदेश, झारखंड बिहारचा आणखी काही भाग, तर पूर्व उत्तर प्रदेशात काही भागात वाटचाल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
राज्यात वातावरणाच्या मधल्या थरात विदर्भ आणि लगतच्या भागावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकणात पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात पहिले दोन दिवस काही ठिकाणी तर त्यानंतर तीन दिवस बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस तर आज २२ ला रत्नागिरी व २५ जूनला साताऱ्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस कोकण व मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात तर पूर्व मराठवाड्यातील विदर्भालगतच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळे वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.