
मुंबई- मागील दोन दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली असली तरी, आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांत अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मागील आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. 16 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्या, पिकांचे मोठे नुकसान झाले आणि शेतकरी हवालदिल झाले. दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धोका अजूनही टळलेला नाही. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा सक्रिय…
काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मुसळधार पाऊस झाला होता. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे, जो राजस्थान आणि पंजाब परिसरात सक्रिय होईल. याचा परिणाम म्हणून 25 ते 28 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. विशेषतः, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा या भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

घाटमाथ्यावर यलो अलर्ट…
दरम्यान, पुढील पाच दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुढील 24 तासांत रायगड, सातारा, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असून या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करताना, पूरसदृश परिस्थिती किंवा भूस्खलनाचा धोका असलेल्या भागांत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर