
*पुणे-* राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली होती. मात्र आता पुणे, नाशिकमध्ये पावसामुळे आलेला पूर ओसरला आहे. आज राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची उघडीप पाहायला मिळणार आहे. केवळ कोकण आणि विदर्भातील १५ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित ठिकाणी मात्र पाऊस विश्रांती घेणार आहे.
*राज्यात आज पावसाचा जोर ओसरणार…*
राज्यातील पावसाचा जोर ओसरल्यानंतर अनेक भागात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची येलो अलर्ट आहे. तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पावसाची उघडीप मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
*कुठे कोणता अलर्ट?…*
हवामान खात्याकडून रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारामध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे.
*कमी दाबाचा पट्टा सक्रिय…*
दरम्यान, सध्या दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घाटमाथ्यावर पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी सतर्क राहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
*दोन दिवस झाला मुसळधार पाऊस..*
राज्यातील अनेक जिल्ह्यांना सलग दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढलं. विशेषत: पुणे आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पुण्यातील भिडे पूल सलग चौथ्या दिवशी पाण्याखाली गेला, तर नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला. दरम्यान, सोमवारी राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. आज मंगळवारी राज्यातील विविध भागात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.