कर्जत: सुमित क्षीरसागर केंद्र शासनाने लागू केलेल्या हिट अँड रन या कायद्याचा देशभरात विरोध करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात ट्रक चालकांनी संप पुकारत आंदोलन केले होते. त्यावेळी कायदा लागू होणार नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर ट्रक चालकांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र याबाबत शासन समाधानकारक उत्तर देत नसल्याने आता या आंदोलनाचे लोण कर्जत येथे पोहचले आहेत. कर्जत चारफाटा येथे आज सर्वसाधारण चालक मालक संघाकडून हिट अँड रन या कायद्या विरोधात आंदोलन पुकारत निदर्शने करण्यात आली. तर या आंदोलनामुळे चारफाटा परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. केंद्र सरकारकडून वाहतूक नियमांमध्ये सुधारणा करत नवीन हिट अँड रन कायदा पारित करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर पळून जाणे हे हिट अँड रन समजले जाते. तर आतापर्यंत या प्रकरणामध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात येत होती आणि जामीनही मिळत होता. बदलत्या नव्या नियमानुसार जर कोणी वाहनाला धडक दिली आणि चालक पोलीस प्रशासनाला न सांगता घटनास्थळावरून पळून गेला, तर त्याला १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि दंडही ठोठवला जाणार आहे. या कायद्याला चुकीचे ठरवत देशभरातून आंदोलन केले जात आहे. नुकतेच या कायद्याला विरोध करत ट्रक चालकांनी आंदोलन पुकारले होते. तर आता याबाबत शासन समाधानकारक उत्तर देत नसल्याने चालक आक्रमक झाले आहेत. कर्जत येथील मुख्य चौक मानला जात असलेल्या कर्जत चारफाटा येथे आज दिनांक ११ जानेवारी रोजी सर्वसाधारण चालक मालक संघाकडून या कायद्याविरोधात आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी शेकडो चालकांनी कर्जत चारफाटा येथे जमत केंद्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कर्जत चारफाटा हा तालुक्यातील मुख्य चौक असल्याने आंदोलनामुळे काही काल वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र हा कायदा सर्वच चालकांना मारक असल्याने वाहनचालकांनी देखील यावेळी आंदोलनाला संमती दर्शवली. तर वाहतुकीचे नियोजन होण्यासाठी कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड हे आपल्या पोलिस पथकासह कर्जत चारफाटा येथे वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होतें दरम्यान यावेळी कर्जत वाहन चालक मालक संघाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांची भेट घेतली तेव्हा घारे यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला.
जाहिरात