*रत्नागिरी l 13 ऑगस्ट-* राज्यामध्ये डिजीटल स्वाक्षरीत सातबारा जगभरातील व्यक्ती कोठूनही काढू शकतो यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी यांनी रात्रंदिवस काम केले. ई मोजणी, ई मुल्यांकन, डिजीटल सातबारा, ई पीक पहाणी, ई फेरफार सारखे प्रकल्प देश पातळीवर स्वीकारले जात आहेत, असे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.
महसूल पंधरवडानिमित्त जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज महसूल अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी संवाद व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.
डिजीटल इंडिया लॅन्ड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम या विषयावर उपजिल्हाधिकारी श्री. जगताप यांनी सविस्तर माहिती दिली. हस्तलिखितावरुन डिजीटलकडे सातबारा नेण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी यांनी रात्रंदिवस काम केले. अचूक सातबारे झाले. सातबारा मालकी हक्काचा पुरावा नसला तरी खूप किंमतीचा आहे, असे सांगून श्री. जगताप यांनी राज्य समन्वयक म्हणून केलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी स्वागत, प्रस्ताविक केले. कार्यक्रमाला महसूल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.