अनेक संकटांवर मात करीत मुरबाड सारख्या ग्रामीण भागातील प्रियंका बोरगे झाली एमबीबीएस डॉक्टर..!

Spread the love

*ठाणे/  मुरबाड प्रतिनिधी/ लक्ष्मण पवार-*  : ठाणे जिल्ह्यात गेली पंचवीस वर्षे निष्कलंक पत्रकारितेतून आपल्या लिखाणाचा ठसा उमटविणारे अभ्यासू पत्रकार संजय रमाकांत बोरगे यांच्या आजवरच्या संघर्षाला यश आले असून त्यांची मुलगी नुकताच परदेशातून डॉक्टर होऊन भारतात परतली आहे.

गेली सहा वर्षे पत्रकार बोरगे यांची थोरली मुलगी डॉ. प्रियंका संजय बोरगे ही रशिया येथे एमबीबीएस (MBBS) पदवीचे वैद्यकीय शिक्षण घेत होती. तत्पूर्वी तिने पहिली ते पाचवी पर्यंत प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद केंद्र शाळा देवगाव घेतले त्यानंतर इयत्ता सहावी ते बारावी असा सहा वर्षीय माध्यमिक-उच्च मध्यमिक  शिक्षण नवोदय विद्यालय माहीम पालघर येथे पूर्ण करून एकंदरीत सुमारे बारा वर्षांचा एक शैक्षणिक तप या पदवी पर्यंत पोहचण्यासाठी खर्ची लावला आहे. दरम्यान, वडील संजय बोरगे व कुटुंबियांनी कठोर आर्थिक परिस्थितीचा सामना करून लेकीला डॉक्टर झालेलं पाहण्याचे स्वप्न वास्तवात आणले. बोरगे हे पत्रकारिते सोबत उदरनिर्वाहसाठी मुरबाड एमआयडीसीमधील टायगर स्टील कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत आहे. कौटुंबिक परिस्थिती हालाकीची असतांना देखील प्रियंकाच्या शिक्षणात खंड पडू न दिल्याने आज बोरगे कुटुंबियांच्या संघर्षाचे सोनं झालेले पाहायला मिळत आहे.

वडिलांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी प्रियंका हिने तत्पूर्वीच यूट्यूबच्या माध्यमातून इंग्रजी व रशियन भाषेचा सराव करून अल्पावधीतच त्यावर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळविले होते. सर्व कागदोपत्री तरतुदींच्या अटी शर्ती पूर्ण करून प्रियंका अखेर रशियाला रवाना झाली खरी मात्र, तोच कोरोनाच्या महामारीने जन्म घेतला व पाहता पाहता अवघे जग पादाक्रांत केले. यात सुरुवातीला रशियाचा प्रांत सर्वाधिक रेड अलर्टच्या छायेत राहिला. त्यामुळे अनेक भयभीत विद्यार्थी भारतात परतले. परंतु, प्रियंकाने हार न मानता चिकाटीने आपल्या वडिलांच्या स्वप्नाला तथा पर्यायाने अवघ्या मुरबाड तालुक्याच्या अस्मितेला सकारात्मक स्वरूप देण्याच्या प्रयत्नांना कमी पडू दिले नाही. कोरोनाचा दीर्घ काळ उलटल्यावर प्रियंका प्रथमच भारतात परतली होती. तेव्हा, समाजाच्या विविधांगी स्तरावरून कित्येकांनी तिचे भरभरून कौतुक केले. यानंतर प्रियंका पुन्हा कर्तव्यावर पोहचल्यानंतर युक्रेन – रशिया महायुद्धाचे नगारे वाजले. याचा अपरिहार्य परिणाम पुन्हा रशियातील भारतीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पडला. मात्र शिक्षणाच्या अदम्य भावनेने झपाटलेल्या प्रियांकाला तिच्या उचित ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी हे अडथळे रोकू शकले नाही व अखेर मोठ्या जिद्दीने एमबीबीएसचे सहा वर्षीय अभ्यासक्रम यशस्वी रित्या पूर्ण करीत प्रियंका नुकताच मायदेशी परतली आहे. सबब, प्रियंकाचा हा डॉक्टर बनण्या पर्यंतचा संघर्षमय प्रवास वैद्यकीय क्षेत्रातील अनेक आशावादी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.

डॉ. प्रियंका यांच्या पाठोपाठ पत्रकार बोरगे यांची दुसरी मुलगी प्रेरणा देखील इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशमधून इंजिनिअर झाली आहे. तर दोन्ही मुलांपैकी प्रेम हा कल्याण येथील नामांकित बिर्ला कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत  पदवीचे शिक्षण घेत असून सर्वात धाकटा साईराज हा मुरबाड येथे इयत्ता १० मध्ये शिकत आहे. त्यामुळे पत्रकार बोरगे यांच्या मुलींप्रमाणे दोन्ही मुले देखील शिक्षणाच्या वाटेवर भवितव्य घडविण्यासाठी अग्रेसर असून आईवडीलांचे नाव लौकिक करीत आहेत.

नुकताच वयाच्या पंच्याऐंशीत पदार्पण केलेले घरातील उच्च शिक्षित जेष्ठ सदस्य अर्थात पत्रकार संजय बोरगे यांचे वडील रमाकांत बोरगे हे उत्कृष्ट प्रकृती व दृष्टी बाळगून आजही दररोज नियमितपणे वर्तमानपत्रांचे काटेकोर वाचन करून आपल्या नातवंडांना मार्गदर्शन करीत असतात. मात्र गत सात वर्षांपूर्वी या कुटुंबाची माऊली सुमन आई जग सोडून गेल्याने कोलमडलेल्या बोरगे कुटुंबाची नव्याने उभारणी करून पत्रकार बोरगे यांच्या सहचारिणी सीमा अगदी नेटाने आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

त्यामुळे या कुटुंबियांच्या जिद्दीपणाचे आज सर्वत्र कौतुक केलं जातं असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर डॉ. प्रियंका बोरगे या सध्या भारतातच राहून वैद्यकीय प्रॅक्टिसद्वारे आपल्या लोकांची सेवा करणार असल्याचे त्यांनी  बोलतांना सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page