
नागपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी नागपूर दौऱ्यावर आहेत. सकाळपासून मोदींचा नागपूर दौरा सुरु झाला असून ते दिवसभरात विविध ठिकाणांना भेट देणार आहेत. रविवारी मोदींचे स्वागत करण्यासाठी राज्यपाल सी. पी राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. नागपूर दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांनी 8 वर्षांनी दीक्षाभूमीला भेट दिली. तसेच संघाच्या स्मृती मंदिरालाही त्यांनी भेट दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी नागपूर येथील दीक्षाभूमी स्थळी दाखल झाले आणि यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला भेट दिली. दीक्षाभूमी स्मारकाच्या आतमध्ये असलेल्या गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला मोदींनी अभिवादन केले. तसेच दीक्षाभूमीच्या पवित्र स्तूपांमध्ये बुद्ध वंदना केली. यापूर्वी 2017 रोजी नरेंद्र मोदी नागपूरच्या दीक्षाभूमीला आले होते. 14 एप्रिल 2017 रोजी त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली होती त्यानंतर आठ वर्षानंतर मोदीजी दीक्षाभूमीवर आले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांपैकी एक असलेल्या नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट देण्याचे सौभाग्य मिळाले, याचा मला अभिमान वाटतो.



या पवित्र स्थळाच्या वातावरणात बाबासाहेबांचे सामाजिक समता आणि न्याय यांचे सिद्धांत प्रकर्षाने जाणवतात. दीक्षाभूमी आपल्याला गरीब, वंचित आणि शोषितांसाठी सन्मान, हक्क आणि न्यायासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते, असा संदेश मोदी यांनी दीक्षाभूमीबाबत लिहिला. पंतप्रधान मोदी यांनी नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट देऊन येथील स्मृति मंदिराला नमन केलं आहे.परम आदरणीय डॉ. हेडगेवार जी आणि आदरणीय गुरुजींना विनम्र अभिवादन. त्यांच्या आठवणी जपत या स्मृती मंदिरात येऊन मी भारावून गेलो आहे. भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटनात्मक शक्ती या मूल्यांना समर्पित असलेले हे स्थान आपल्याला राष्ट्रसेवेत पुढे जाण्याची प्रेरणा देते. संघाच्या या दोन भक्कम स्तंभांचे हे स्थान देशसेवेसाठी समर्पित असलेल्या लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जास्रोत आहे. आपल्या प्रयत्नांनी भारतमातेचा अभिमान सदैव वाढू दे, असे मोदीजी यांनी म्हटले.