शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश; म्हणाले, “शिवराज्याभिषेक हा एक अद्भुत…!”

Spread the love

रायगडावर तिथीनुसार ३५०व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
रायगड- स्वराज्याची स्थापना करण्याचं ध्येय घेऊन वयाच्या १६व्या वर्षी शपथ घेणाऱ्या शिवरायांचे बरोबर ३५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ‘छत्रपती’ शिवाजी महाराज झाले! रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्या घटनेला तिथीनुसार आज ३५० वर्षं पूर्ण झाली. यानिमित्ताने रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जात आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहपरिवार उपस्थित आहेत. त्यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय मंडळींनी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर हजेरी लावली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे, राम शिंदे आदी नेतेही यावेळी उपस्थित होते.

रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी अवघ्या रायगडावर फुलांची आरास करण्यात आल्याचं दिसून आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी फुलांनी सजवण्यात आलं. महाराजांचा बसलेल्या स्थितीतील चांदीचा पुतळा पालखीसाठी सजवण्यात आली. या पालखी सोहळ्यासाठी अनेक नेतेमंडळी आणि मान्यवर उपस्थित आहेत.

राज्य सरकारकडून ३५० कोटींचा निधी

शिवराज्याभिषेकाचं हे ३५०वं वर्षं असून यानिमित्ताने विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी राज्य सरकारकडून अर्थसंकल्पातच ३५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. “छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यावर अंगी स्फुरण चढणार नाही, असा एकही माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा आपण उत्साहात साजरा करत आहोत. महाराष्ट्र सरकारतर्फे शिवराज्याभिषेक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.विविध कार्यक्रमांसाठी ३५० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे”, असं ते म्हणाले.

“पुण्याच्या आंबेगावात छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान आपण उभारत आहोत. याचप्रमाणे मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर या ठिकाणी दृकश्राव्य माध्यम सुविधेसह सार्वजनिक उद्यानं विकसित केली जाणार आहेत. या उद्यानांमध्ये छत्रपती शिवरायांची जीवनगाथा प्रदर्शित केली जाईल. शिवरायांचं जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारलं जाणार आहे. शिवराज्याभिषेक दिन सदैव स्वराज्याची, सार्वभौमत्वाची प्रेरणा देणारा दिवस. या दिवसानिमित्त रायगडावर राज्य सरकारतर्फे शिवराज्याभिषेक सोहळ्याचं तर रायगडाच्या पायथ्याशी १ ते ७ जून या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे”, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडीओमध्ये दिली आहे.

“शिवछत्रपतींचा राज्याभिषेक महाराष्ट्रच नाही, देशच नाही तर अवघ्या जगासाठी आनंदाचा दिवस आहे. छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होण्यासाठी इथे सगळे जमले आहेत. महाराष्ट्रातले अनेक दिग्गज नेते इथे येत आहेत. आनंद वाटतोय. राज्य सरकारने यासाठी सर्व काळजी घेतली आहे. कुणाचीही अडचण होता कामा नये यासाठी सर्व नियोजन केलं आहे. तिथी आणि तारखेनुसार या सात दिवसांच्या कालखंडात हा सोहळा होतोय. त्यानिमित्ताने सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत”, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते राम शिंदे यांनी दिली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page