नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 24 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी साडेबारा वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नऊ वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात येईल. या नव्या वंदे भारत रेल्वे गाड्या म्हणजे देशभरातील दळणवळण व्यवस्था सुधारण्याबाबत तसेच रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत पंतप्रधानांनी मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने पुढे टाकलेले पाऊल आहे.
उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेस, तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेस, हैदराबाद-बेंगळूरू वंदे भारत एक्स्प्रेस, विजयवाडा-चेन्नई (रेनीगुंता मार्गे) वंदे भारत एक्स्प्रेस, पाटणा-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस, कासारगोड-थिरूवनंतपुरम वंदे भारत एक्स्प्रेस, राऊरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्स्प्रेस, रांची-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस,जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. या नऊ रेल्वे गाड्यांमुळे, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओदिशा, झारखंड आणि गुजरात अशा अकरा राज्यांतील दळणवळणाला चालना मिळणार आहे.