संयुक्त अरब अमीरात (UAE) इथं जागतिक हवामान कृती शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी दुबईत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दुबईतील भारतीयांनी जोरदार स्वागत केलं.
दुबई PM Modi in Dubai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिट (COP28) मध्ये सहभागी होण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये आगमन झाल्यानंतर दुबईतील भारतीय नागरिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी हॉटेलबाहेर सांस्कृतिक नृत्यही सादर करण्यात आलं. यावेळी दुबईतील भारतीय ‘मोदी, मोदी’च्या घोषणा देताना दिसले. तसंच त्यांनी ‘मोदी सरकार’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणाही दिल्या. पंतप्रधान मोदी हॉटेलबाहेर भारतीयांशी हस्तांदोलन करताना दिसले. भारतीय सदस्यांनी सांस्कृतिक नृत्य सादर करुन त्यांचं स्वागत केलं.
काय म्हणाले दुबईतील भारतीय…
यावेळी उपस्थित असलेल्या एका भारतीयानं सांगितलं की, यूएईमध्ये पंतप्रधान मोदींना भेटून मला खूप आनंद झाला. ते म्हणाले की, मी 20 वर्षांपासून यूएईमध्ये राहतोय, पण आज असं वाटलं की माझंच कोणीतरी या देशात आलं आहे. मी जेवढा आनंद व्यक्त करु शकतो तेवढा कमी आहे, असंही ते म्हणाले. पुढं ते म्हणाले की, संपूर्ण जगात भारताचा गौरव करणारा हा भारताचा हिरा आहे. आणखी एका भारतीय नागरिकानं आनंद व्यक्त केला आणि सांगितलं की पंतप्रधान मोदींना इथं पाहून आम्हाला खूप आनंद झाला. तसंच ते म्हणाले की, आम्ही हा दिवस आमच्या आयुष्यात कधीही विसरणार नाही. जगाला पीएम मोदींसारख्या नेत्याची गरज आहे. आणखी एका सदस्यानं पंतप्रधान मोदींच्या भेटीचा अनुभव सांगत म्हणाले की, आमच्याकडं बोलण्यासाठी शब्द नाहीत. पीएम मोदींनी आमच्याशी हस्तांदोलन केलं आणि आमच्या ‘पगडी’मुळं त्यांनी आम्हाला ओळखलं, याचा आम्हाला खूप आनंद आहे.
जगभरातील 160 नेते होणार सहभागी…
युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) चे 198 देश सदस्य आहेत. दुबई इथं होणाऱ्या COP28 या शिखर परिषदेला 160 जागतिक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या शिखर परिषदेत सर्व देशांच्या राष्ट्राध्यक्षांव्यतिरिक्त, व्यापारी नेते, तरुण, हवामान शास्त्रज्ञ, पत्रकार, स्थानिक लोक आणि इतर तज्ञांसह 70 हजार नागरिक सहभागी होणार आहेत.