संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत (COP 28) पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “भारतानं पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यात परिपूर्ण संतुलन साधून जगासमोर विकासाचं मॉडेल सादर केले आहे”. वाचा पूर्ण बातमी..
दुबई (Narendra Modi COP 28)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१ डिसेंबर) युएई मधील COP 28 शिखर परिषदेला संबोधित केलं. संबोधनादरम्यान ते म्हणाले की, भारत २०२८ मध्ये हवामान बदलावरील शिखर परिषदेचं आयोजन करण्यास तयार आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी, भारताला पुढच्या वेळी COP 33 चं आयोजन करण्याची संधी दिली जावी, असा प्रस्ताव ठेवला.
▪️युएईच्या दोन दिवसीय दौऱ्यावर-
पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्या निमंत्रणावरून ते गुरुवारी रात्री उशिरा दुबईला पोहोचले. COP 28 शिखर परिषद ३० नोव्हेंबरला सुरू झाली, जी १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. पंतप्रधान मोदी आजच भारतात परतणार आहेत.कार्बन उत्सर्जनात भारताचं योगदान फार कमी : आपल्या भाषणाची सुरुवात करताना मोदी म्हणाले की, ‘१७ टक्के लोकसंख्या असूनही, जागतिक कार्बन उत्सर्जनात भारताचं योगदान ४ टक्क्यांपेक्षा कमी आहे. जी २० अध्यक्षपदाच्या काळात आमचं बोधवाक्य होतं ‘एक पृथ्वी, एक परिवार’. भारतानं उत्कृष्ट संतुलन राखून विकासाचं मॉडेल जगासमोर मांडलंय”. यावेळी पंतप्रधान मोदींनी ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांचीही भेट घेतली.
▪️ग्रीन क्रेडिट उपक्रमाचा प्रस्ताव दिला –
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “गेल्या शतकातील चुका आपल्याला लवकर सुधारायच्या आहेत. भूतकाळातील चुका सुधारण्यासाठी फारच कमी वेळ आहे. यासाठी एकजुटीनं काम करावं लागेल. भारत निश्चित केलेली उद्दिष्टं साध्य करण्याच्या मार्गावर आहे”. यावेळी कार्बन क्रेडिटचं व्यावसायीकरण संपवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ग्रीन क्रेडिट उपक्रमाचा प्रस्ताव दिला. ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह मार्केट-आधारित यंत्रणेद्वारे पर्यावरणाच्या दृष्टीनं सकारात्मक कृतींना प्रोत्साहन देईल आणि ग्रीन क्रेडिट्स तयार करेल, जे व्यापार करण्यायोग्य असतील आणि देशांतर्गत बाजार प्लॅटफॉर्मवर व्यापारासाठी उपलब्ध केले जातील.
▪️नेट झिरो कार्बन एमिशनचं लक्ष्य-
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही नॉन-जीवाश्म इंधनाचा वाटा ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत २०७० पर्यंत नेट झिरो कार्बन एमिशनचं लक्ष्य गाठत राहील. पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त या शिखर परिषदेत COP 28 प्रमुख सुलतान अहमद अल जाबेर आणि UNFCC चे कार्यकारी सचिव सहभागी आहेत.