प्राजक्ता माळीचा संताप, म्हणाली- सुरेश धसांनी माफी मागावी:धस यांनी मागणी फेटाळली, म्हणाले- हास्यजत्रा पाहणे सोडणार!….

Spread the love

मुंबई- भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचा उल्लेख केला होता. यावरूनच राजकारणात कलाकारांना का खेचता? असा सवाल अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सुरेश धस यांना केला आहे. या प्रकरणावर शांत राहा, असे मला सर्वांनी सांगितले. या सर्व आवया येतात आणि निघून जातात. चिखलफेक होऊ नये, म्हणून मी इतके दिवस शांत बसले. परंतु, लोकप्रतिनिधी आपल्यावर चिखलफेक करतात, त्यावेळी बोलणे गरजेचे आहे, असे प्राजक्ता माळी म्हणाली.

या प्रकरणी मी महिला आयोगाकडे तक्रार केली असल्याचे प्राजक्ता माळी यावेळी सांगितले. आमचे कलाक्षेत्र बदनाम नाही, परंतु, अशा माणसांमुळे आमचे कलाक्षेत्र बदनाम होते, असेही तिने सांगितले. ती आज पत्रकार परिषदेत बोलत होती.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केला होता. अभिनेत्री प्राजक्ताताई माळी आमच्याकडे येतात. आम्ही परळीत बघत असतो, रश्मिका मंधाना, सपना चौधरी येत असतात. ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचं शिक्षण घ्यायचे असेल त्यांनी परळीत यावे. प्राजक्ता माळीही आमच्याकडे येत असतात. त्यांचा अतिशय जवळचा पत्ता सापडायचा असेल, तर आमचा परळी पॅटर्न बघितला पाहिजे, असे सुरेश धस यांनी म्हटले होते.

एका सांस्कृतिक कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना काढलेला एक फोटो, ती आमची एकमेव भेट आणि धन्यवाद या एकमेव शब्दावरून एवढी आरोळी उठवावी? असा सवाल प्राजक्ता माळीने केला. माझ्यावर माझ्या सोबतच्या लोकांचा विश्वास होता. ती माझी जमेची बाजू होती. त्यामुळे मला माझ्या चारित्र्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी समोर येण्याची गरज वाटली नाही. आज आलेली वेळी नामुष्की आहे. एक लोकप्रतिनिधी टिपण्णी करतात, त्यामुळे ही वेळ आली आहे, अशी खंत प्राजक्ता माळीने व्यक्त केली.

राजकारणात कलाकारांना का घेता?….

माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे. तुम्ही राजकारणी आहात, आम्ही कलाकार आहोत. तुम्ही तुमचे राजकारण करा, पण आम्हाला कलाकारांना मध्ये का घेता? परळीला केवळ महिला कलाकारच येतात का, पुरुष कलाकार कधी गेलेच नाहीत का? महाराष्ट्रातील राजकारण्यांना हे शोभत नाही, तुम्ही महिला कलाकारांच्या चारित्र्यावर संशय घेत नाहीत, तर त्यांच्या कर्तृत्वावर देखील प्रश्न उपस्थित करतात, असे म्हणत प्राजक्ता माळीने आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार पलटवार केला. कुठल्या राजकारण्यांच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का? अशी टिप्पणी करून तुम्ही स्वत:ची मानसिकता दाखवत आहात. ही खेदजनक बाब आहे, असेही प्राजक्ता माळीने यावेळी नमूद केले.

महिला आयोगाकडे तक्रार; CM, DCM लाही केली विनंती….

मी विनंती करते तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी महिला कलाकारांची नावं घेणं बंद करा. हे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही. सुरेश धस यांनी विनम्रपणे माझी माफी मागावी. मी आज महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी योग्य ती कारवाई करावी. मीदेखील कायदेशीर कारवाई करत राहीन. मा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी विनंती करते. माझी आई झोपलेली नाही. माझ्या भावाने सगळे सोशल मीडिया अकाऊंट्स डिलीट केलेत. माझ्या कुटुंबावरही याचा अत्यंत वाईट परिणाम होतोय. या सगळ्याला तोंड देणं हे अजिबात सोपं नाही. मुख्यमंत्र्यांनी मी विनंती करते की त्यांनी याबाबत ठोस कारवाई करावी, असे प्राजक्ता माळी म्हणाली.

कायदेशीर मार्गाने कारवाई करेन…

बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना तुमची गाडी कलाकारांवर का घसरते? हे सगळं कितपत योग्य आहे, तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ. त्यांनी माफी मागितली नाही तर, कायदेशीर मार्गाने माझ्या वकिलांमार्फत कारवाई करेन, असेही तिने म्हटले आहे.

प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही – सुरेश धस…

एखाद्या महिलेचा अवमान होईल, असे मी बोललो नाही. माझा बाईट पाहावा. मी प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही. प्राजक्ता माळी यांनी माझा निषेध केला असेल, तर त्यांचा निषेध म्हणून हास्यजत्रा कार्यक्रम बघायचे बंद करेन. माझ्या ठायी प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे, असे सुरेश धस म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून तुम्ही हिरो-हिरोइनकडे वळू नका, अशी विनंतीही त्यांनी माध्यमांना केली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page