भारताचा युवा बुद्धिबळपटू आर प्रज्ञानानंदनं आणखी एक कीर्तिमान स्थापित केला आहे. तो दिग्गज विश्वनाथन आनंदला मागे टाकून भारताचा सर्वोच्च मानांकित खेळाडू बनला आहे.
विज्क आन झी (नेदरलँड)-
भारताचा युवा बुद्धिबळ सुपरस्टार आर प्रज्ञानानंदनं टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत विद्यमान विश्वविजेता चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला. या विजयासह तो दिग्गज विश्वनाथन आनंदला मागे टाकून भारताचा नंबर 1 चेस खेळाडू बनला आहे.
विश्वनाथन आनंदला मागे टाकलं..
या विजयानंतर, 18 वर्षीय प्रज्ञानानंदचे 2748.3 रेटिंग गुण झाले, जे FIDE लाइव्ह रेटिंगमध्ये पाच वेळच्या विश्वविजेत्या आनंदच्या 2748 गुणांपेक्षा जास्त आहेत. जागतिक बुद्धिबळाची ही सर्वोच्च संस्था दर महिन्याच्या सुरुवातीला रेटिंग जारी करते. विशेष म्हणजे, प्रज्ञानानंदनं काळ्या मोहऱ्यांसह खेळताना 62 चालींमध्ये विजय मिळवला. क्लासिकल बुद्धिबळात विद्यमान विश्वविजेत्याला पराभूत करणारा आनंदनंतरचा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
क्रीडामंत्र्यांनी केलं कौतुक….
प्रज्ञानानंदनं यापूर्वी 2023 मध्येही टाटा स्टील स्पर्धेत लिरेनचा पराभव केला होता. या ऐतिहासिक विजयानंतर प्रज्ञानानंदवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत त्याचं अभिनंदन केलं. भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणाला, “वयाच्या 18 व्या वर्षी तू केवळ खेळावरच वर्चस्व गाजवलं नाही तर भारताचा टॉप रेटेड खेळाडू बनला. तुझ्या आगामी आव्हानांसाठी शुभेच्छा. बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय स्तरावर असाच भारताचा गौरव करत राहा”.
अन्य सामन्यांचे निकाल…
अन्य सामन्यांमध्ये, भारताचा गुकेश अनिश गिरीकडून पराभूत झाला. तर विदित गुजरातीनं जॉर्डन व्हॅन फॉरेस्टविरुद्ध सामना अनिर्णित राखला. या विजयासह अनिशनं स्पर्धेच्या लीडरबोर्डवर अव्वल स्थान पटकावलं आहे. टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत प्राग तिसऱ्या, विदित सातव्या तर गुकेश दहाव्या स्थानावर आहे.