अयोध्येतील भव्य राममंदिरात प्रभू श्रीराम विराजमान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा…

Spread the love

अयोध्या- अयोध्येतील भव्य राम मंदिराचे आज मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी जय श्रीरामाच्या घोषणांनी अयोध्यानगरी दुमदुमून गेली होती. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळी हेलिकॉप्टरमधून राम मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते श्रीरामाची विधीवत पूजा झाल्यानंतर आरती करण्यात आली.

आपल्या लाडक्या दैवताचा हा प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा अवघ्या देशाने डोळेभरून पाहिला. हा सोहळा पाहताना कोट्यावधी रामभक्तांचा ऊर अभिमानने भरून आला होता. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना स्वत: मोदीही मंत्रांचे पठन करत होते. मंत्रोच्चार आणि शंखनाद सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत भावूक झाले होते. दरम्यान, भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक पाहिल्यावर रामभक्तांना भावना अनावर झाल्या होत्या. ‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’ अशा भावना रामभक्तांनी व्यक्त केल्या.

अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने देशातील कोट्यावधी भाविकांनी घरबसल्या प्रभूरामचे दर्शन घेतले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह गर्भगृहात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदी बेन पटेल, राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते. दरम्यान, आज दिवसभर हा सोहळा सुरू असणार असून सोहळ्यानंतर देशभरातील रामभक्तांना प्रसादाचं वाटप केलं जाणार आहे. सोहळ्याची सांगता झाल्यानंतर बुधवार २४ जानेवारी २०२४ पासून राम मंदिर सर्व रामभक्तांसाठी खुलं होणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page