बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवेचा बंदरे विकासमंत्री दादा भुसे यांच्याहस्ते शुभारंभ.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | बेलापूर | फेब्रुवारी ०७, २०२३.

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया, मुंबई या मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्याहस्ते बेलापूर जेट्टी येथे झाले. वॉटर टॅक्सी सेवेमुळे मुंबईला अवघ्या ५५ मिनिटांमध्ये पोचता येणार आहे. मुंबई व परिसरातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी जलवाहतुकीला चालना देण्यात येणार असल्याचे श्री. भिसे यांनी यावेळी सांगितले.

बेलापूर जेट्टीच्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमास आमदार मंदाताई म्हात्रे, बंदरे व परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, नयनतारा शिपिंग कार्पोरेशनचे कॅप्टन रोहित सिन्हा, इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसचे सोहेल काझानी आदी यावेळी उपस्थित होते. वॉटर टॅक्सी सेवेच्या उद्घाटनानंतर मंत्री महोदयांनी वॉटर टॅक्सीतून बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया असा प्रवास केला. वॉटर टॅक्सी सेवेमध्ये एकूण २०० प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात. ही सेवा नयनतारा शिपिंग कार्पोरेशन व इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसमार्फत चालविण्यात येणार आहे.

श्री. भुसे म्हणाले की, नवी मुंबई, ठाणे येथील प्रवाशांना मुंबईत रस्ते मार्गाने जाताना खूप वेळ जातो तसेच वाहतूक कोंडी होते. रस्ते मार्गावरील ताण कमी करण्यासाठी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया ही वॉटर टॅक्सी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेची व इंधनाची बचत होऊन वाहनांचे प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. या सेवेचे दर कमी करण्यासाठी तसेच सेवेच्या सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच जेट्टीपासून ते इच्छितस्थळी जाण्यासाठी कनेटिव्हिटी निर्माण करण्यावरही भर देण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळामुळे या सेवेचे महत्त्व वाढणार आहे.

वॉटर टॅक्सीची सेवेची माहिती जनतेपर्यंत व्हावी व या सेवेला प्रतिसाद मिळावा, यासाठी तसेच महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सेवांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी संकेतस्थळ तयार करावे. महाराष्ट्राला लाभलेल्या सागरी किनाऱ्याचा वापर करून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, पालघर ही शहरे जलमार्गाने जोडण्यावर भर देत आहोत. त्याचप्रमाणे मच्छिमारांसाठी जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

आमदार श्रीमती म्हात्रे म्हणाल्या की, नवी मुंबईतील सागरी किनाऱ्यावर जेट्टीच्या निर्मितीतून मच्छिमार तसेच पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी मदत होणार आहे. बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी उपयुक्त ठरणार असून या सेवेला प्रतिसाद मिळाल्यास त्याचे दर कमी करण्यात यावेत. राज्यातील पहिल्या मरिना प्रकल्पालाही गती देण्यात यावी. श्री. जैन म्हणाले की, वॉटर टॅक्सी सेवेला प्रतिसाद मिळावा, यासाठी प्रवाशांना, पर्यटकांना विविध सेवा सुविधा देण्यांवर भर देण्यात यावा. तसेच जेट्टीपासून वाहतुकीची सोय करावी जेणेकरून प्रवाशांची सोय व्हावी. राज्य शासन मेरीटाईम पॉलीसी तयार करत आहे. यामध्ये सूचना असतील तर पाठवाव्यात. सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सैनी म्हणाले की, वॉटर टॅक्सीमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. यासेवेबरोबरच मेरीटाईम बोर्डाच्या वतीने बेलापूर ते एलिफंटा, बेलापूर ते मांडवा मार्गावरही सेवा सुरू आहे. याशिवाय फ्लेमिंगो राईडही सुरू आहे. लवकरच बेलापूर येथे हॉवर क्राफ्ट सेवा सुरू करणार आहोत. पर्यटनाच्या वाढीसाठी जेट्टीचा वापर व्हावा, यादृष्टीने नियोजन सुरू आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page