कर्जत मध्ये राजकीय शिमगा, आमदार महेंद्र थोरवे व सुधाकर घारे यांच्यात जुंपली, खासदार तटकरे यांच्यावर थोरवेची टीका, तर थोरवे यांना हत्तीच्या पायाखाली चिरडू म्हणत सुधाकर घारे आक्रमक…

Spread the love

नेरळ: सुमित क्षीरसागर – महाविकास आघाडीला कर्जत तालुक्यातून सुरुंग लागला हे वास्तव असताना आता महायुतीला देखील कर्जतमधूनच सुरुंग लागणार अशी चिन्हे आहेत. पेण येथील शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे यांचा निवडणुकीत कडेलोट होईल अशी जहरी टीका आमदार महेंद्र थोरवे यांनी केली होती. त्यानंतर कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थानिक नेते सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेत थोरवे यांना हत्तीच्या पायाखाली चिरडू म्हणत आक्रमक झाले. दरम्यान थोरवे आणि घारे वादात आता महायुतीचे लोकसभा संभाव्य उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या खासदारकीची विकेट पडेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.

कर्जत तालुका राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजला जातो. २०२१ मध्ये कर्जत येथील प्रशासकीय भवनाच्या भूमिपूजनावरून वाद निर्माण झाला होता. तर आमदार महेंद्र थोरवे यांनी तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे यांना विरोध दर्शवल्याने महाविकास आघाडीत सुरुंग लागून राज्यात सत्ताबदल झाला. तर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी पेण येथील शिवसेनेच्या मेळाव्यात टीका करत युतीचा धर्म तटकरे यांनी न पाळल्यास त्यांचा कडेलोट होईल म्हटले होते. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी दिनांक २४ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थानिक नेते तथा राजिपचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कर्जत येथील जनसंपर्क कार्यालयात सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. यापत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे स्थानिक नेते तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, प्रदेश सरचिटणीस भरत भगत, अशोक भोपतराव , रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, कर्जत महिला अध्यक्ष रंजना धुळे, कर्जत तालुका युवक अध्यक्ष स्वप्निल पालकर, कर्जत शहर अध्यक्ष भगवान भोईर, माथेरान शहर अध्यक्ष अजय सावंत, शाहनवाज पानसरे, अरूण हरपुडे, अरूण कराळे, भूषण पेमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेमध्ये सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्र डागले. स्वःताची उंची मोजत एक प्रकारे सुर्यावर थुंकणाऱ्याची थुकी ज्या प्रमाणे त्याच्या अंगावर पडते या प्रमाणे आमदार महेंद्र थोरवे यांचे वक्तव्य असल्याची टीका करत, पाहिल्याच प्रयत्नात अपघाताने आमदार झाले. मात्र ते निवडूण येऊन त्यांची आमदारकी इच्छा पूर्ण झाली असल्याचे त्यांनी म्हंटले. यासह कर्जत – खालापूूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी जर डोळा ठेवणार असले तर मी देखील बघुन घेईल असे थोरवे म्हणाले होते. आमदार थोरवे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत पुढचा आमदार कोणाला करायचा हे कर्जत खालापूरची मायबाप जनता ठरवेल असा सुचक टोला घारे यांनी लगावला. तुम्ही कडेलोट करणार की आम्ही तुम्हाला हत्तीच्या पायाखाली तुडवणार असा पलटवार देखील घारे यांनी केला. असे वक्तव्य करून महायुतीमध्ये मिठाचाखडा टाकणाऱ्यांना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी वेळीच आवर घालावा आम्ही युती धर्म पाळत आमचे काम इमाने इतबार करू असे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस भरत भगत यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्याचा जाहिर निषेध करत, महायुतीमधिल घटक पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्या संदर्भात दखल घेऊन आमदार थोरवे यांना समज देऊन गढूळ होणारे राजकीय वातावरण निवळण्याचे प्रामाणिक काम करावे. जर भाविषात आमच्या पक्षाच्या नेते मंडळी व तळागाळातील कार्यकत्या विषयी असे वक्तव्य झाल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल अशी आपली भूमिका स्पष्ट केली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page