कुर्ला रेल्वे स्थानकात पनवेलला जाणाऱ्या लोकलमधून अचानक धूर; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेतून खाली मारल्या उड्या; कुर्ला स्थानकात उडाला गोंधळ…

Spread the love

*मुंबई-* मुंबईच्या हार्बर मार्गावर लोकल ट्रेनमधून धूर निघत असल्याचं समोर आलं आणि एकच गोंधळ उडाला आहे. कुर्ला स्थानकात हा प्रकार घडला. कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांची कुर्ला स्थानकात मोठी गर्दी होती. या गर्दीच्या वेळीच ट्रेनमधून धूर निघत असल्याच्या घटनेने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. तसंच प्रवाशांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं. अतिशय गर्दीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने प्रवासी सैराभैरा होऊन रूळांवरून धावू लागले.

कुर्ला स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर उभ्या असलेल्या ट्रेनमधून धूर निघू लागला. प्लॅटफॉर्म नंबर ७ वर पनवेलकडे जाणारी लोकल उभी होती. त्याच लोकलमध्ये हा प्रकार घडला. या घटनेने प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला. ट्रेनमधून धूर निघत असल्याने अनेक प्रवाशांनी भीतीने ट्रेनमधून उड्या मारल्या. घटना समोर येताच तात्काळ जीआरपी आणि एएफआर घटनास्थळी दाखल झाले. आठवड्याचा दुसराच दिवस असल्याने प्लॅटफॉर्मवर कामावरुन घरी जाणाऱ्या नोकरदार वर्गाची मोठी गर्दी होती. संध्याकाळच्या वेळी पीक अवर्समध्ये ही घटना घडली.

काही प्रवाशांनी ट्रेनमध्ये स्पार्क झाल्याने धूर आल्याचं पाहिलं आणि त्यानंतर कुर्ला स्थानकातून पनवेलकडे जाणारी लोकल ट्रेन स्थानकात थांबली. लोकलमधून धूर येत असल्याचं समजल्यानंतर अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी घाबरुन लोकलमधून उड्या मारल्या. कोण प्लॅटफॉर्मवर उतरलं, तर काही लोक थेट रेल्वे रुळावर उड्या मारू लागले. काही लोक स्टेशनच्या बाहेर गेले. या घटनेमुळे हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला आहे. हार्बर मार्गावरुन पनवेलकडे जाणारी वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. मात्र आता वाहतूक सुरू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन जवळपास १० ते १५ मिनिटं उशिराने धावत आहेत. लोकलमधून अचानक धूर कसा येऊ लागला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र या घटनेने स्थानकात मोठा गोंधळ, भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page