जनशक्तीचा दबाव न्यूज | चेन्नई | फेब्रुवारी ०४, २०२३.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्गज पार्श्वगायिका वाणी जयराम यांचे निधन झाले आहे. चेन्नईतील नुंगमबक्कम येथील हॅडोस रोडवरील त्यांच्या राहत्या घरी त्या मृतावस्थेत आढळून आल्या. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं नसून त्यांच्या कपाळावर जखम झाल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला असून सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिग्गज पार्श्वगायिका वाणी जयराम यांना पद्मभूषण हा भारतातील तिसरा – सर्वोच्च नागरी पुरस्कार नुकताच जाहीर झाला होता. वाणी जयराम यांनी मोठमोठ्या संगीतकारांसोबत अनेक सदाबहार गाणी गायली आहेत. या प्रतिभावान गायिकेने तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, हिंदी, उर्दू, मराठी, बंगाली, भोजपुरी, तुलू आणि ओरिया भाषेतील अनेक गाणी गाऊन ती अजरामर केली आहेत. त्यांनी देशविदेशात आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे.
कारकिर्दीत एकूण तीन वेळा त्यांनी ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. त्यांना तमिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात आणि ओडिशा येथून राज्य पुरस्कारही मिळाले आहेत. अशा या गुणी गायिकेच्या निधनाने विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.