२० लाखांचे दागिने केले लंपास.
जनशक्तीचा दबाव न्यूज | परभणी | फेब्रुवारी ०५, २०२३.
परभणी जिल्ह्यातील पालम मोंढा भागातील सिद्धनाथ ज्वेलर्सवर दोघांनी बंदूक व चाकूचा धाक दाखवून धाडसी दरोडा टाकला. यामध्ये तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सोन्याचे व चांदीचे मिळून तब्बल २० लाखांचे दागिने लंपास केले. ही घटना आज शनिवारी रात्री ८ वाजता घडली.
पालम शहरातील मोंढा भागात सराफा व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. त्यातील सूर्यकांत शिंदे यांच्या सिद्धनाथ ज्वेलर्स या दुकानात ते व मुनीम दुकान बंद करण्याच्या तयारीत होते. तितक्यात रात्री ८ वाजता तोंडाला रूमाल बांधून दुचाकीवरून आलेले दोघे दुकानात शिरले. त्यांनी मालक व मुनीमास बंदूक व चाकूचा धाक दाखवून दुकानातील सोन्याचे व चांदीचे दागिने हिसकावून घेण्यास सुरुवात केली. दुकानातील नेकलेस, झुंबर, मनी -मंगळसूत्र, गंठण यासह अन्य सोन्याचे व चांदीचे दागिने बॅगेत भरले.
परंतु बंदुकीच्या धाकामुळे दुकान मालक व मुनीमांनी आरडाओरडा केला नाही. तरीही दागिने हिसकावत असतानाचे दृश्य परिसरातील दुकानदार व नागरिकांनी पाहिले. ते पाहून दुकानाजवळ येऊन सदर चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना देखील बंदुकीचा धाक दाखवून सदर चोरटे दूचाकीवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पालम ठाण्याचे पो. नि. प्रदीप काकडे, स. पो. नि. मारुती कारवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत मोंढ्यात मोठी गर्दी जमली होती.