बॉलीवूडचे लोकप्रिया कलादिग्दर्शक दिवंगत नितीन देसाईंना ऑस्कर सोहळ्यात आदरांजली वाहण्यात आली.
नितीन देसाई यांनी कर्जतमध्ये आत्महत्या केली होती..
यंदाचा ऑस्कर सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये आज (११ मार्च रोजी) पार पडला. या सोहळ्यातील ‘इन मेमोरिअम’ सेगमेंटमध्ये बॉलीवूडमधील मराठमोळे कलादिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांना आदरांजली वाहण्यात आली. या सोहळ्यात उपस्थितांनी नितीन देसाईंचं स्मरण केलं. दिवंगत टिना टर्नर, मॅथ्यू पेरी आणि इतर अनेक जणांची नावं या यादीत होती. २०२३ मध्ये देसाई यांनी ५७ व्या वर्षी आत्महत्या केली होती.
नितीन देसाई यांनी संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर काम केलं होतं. ‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे सेट त्यांनी तयार केले होते. राजकुमार हिरानी, विधू विनोद चोप्रा आणि आशुतोष गोवारीकर यांसारख्या चित्रपट निर्मात्यांसमवेत त्यांनी काम केलं होतं. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘दोस्ताना’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘मिशन कश्मीर’, ‘जोश’ आणि ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटांचे ते कला दिग्दर्शक होते. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ हा २०१९ सालचा ऐतिहासिक चित्रपट नितीन देसाईंचा शेवटचा चित्रपट होता. हिंदी सिनेसृष्टीतील कलादिग्दर्शनाच्या क्षेत्रात नितीन देसाईंचं मोठं योगदान आहे.