‘आई’ पर्यटन धोरणामुळे महिलांना उद्योजिका बनण्याची संधी…

Spread the love

रत्नागिरी:- पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असून महिलांच्या सक्षमीकरणा साठी ‘आई’ महिला केंद्रीत/लिंग समावेशक पर्यटन धोरण आखण्यात आले आहे. महिला उद्योजकता विकास, महिलांकरिता पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने/सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास ही या धोरणाची पंचसुत्री आहे.

पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या १० पर्यटन व्यवसायांना (होमस्टे, हॉटेल / रेस्टॉरंट, टूर अॅन्ड ट्रॅव्हल एजन्सी इ.) पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी मान्यताप्राप्त बँकांमार्फत घेतलेल्या रु.१५ लाख पर्यंतच्या कर्जाच्या रक्कमेवरील व्याजाची रक्कम १२% च्या मर्यादेत, त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा ७ वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम रु.४ लाख ५० हजारांच्या मर्यादेपर्यंत या तीन पर्यायांपैकी जे आधी घडेल तोपर्यंत, दरमहा पुढील अटींच्या अधीन राहून जमा करण्यात येईल.

पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असला पाहिजे, पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या असला पाहिजेत, महिलांच्या मालकीच्या हॉटेल / रेस्टॉरंट्समध्ये ५०% व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील.

महिलांच्या मालकीच्या टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सी मध्ये ५०% कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील, पर्यटन व्यवसायाकरीता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात, कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजेत. पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत पर्यटन व्यवसायामध्ये कार्यरत असलेल्या महिला सहल मार्गदर्शक, महिला वाहन चालक, महिला सहल संचालक (टूर ऑपरेटर) व इतर महिला कर्मचारी यांना केंद्र / राज्य शासनाच्या विमा योजनेमध्ये सहभागी करुन त्यांचा वार्षिक विमा हप्ता पहिली ५ वर्षे शासनामार्फत भरण्यात येईल.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत प्रोत्साहने व सवलती :-

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे औरंगाबाद येथील पर्यटक निवास, राज्यातील प्रथम पूर्णतः महिला संचालित पर्यटक निवास म्हणून व खारघर रेसिडेन्सीचे “अर्का रेस्टॉरंट” पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट म्हणून चालविण्यात येईल.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या टूर ऑपरेटरमार्फत आयोजित पर्यटन सर्किट / पॅकेजेस मध्ये महिला पर्यटकांना २०% सूट देण्यात येईल. या २०% सवलतीची रक्कम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे टूर ऑपरेटरला दिली जाईल. याकरीता होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास शासनाकडून करण्यात येईल.

सर्व महिला पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व रिसॉर्टस/ युनिट्स मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त १ ते ८ मार्च या कालावधीत तसेच, वर्षभरात इतर २२ दिवस अशाप्रकारे एकूण ३० दिवस, फक्त ऑनलाईन बुकींगमध्ये ५०% सूट देण्यात येईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणी, महिला बचत गटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादींच्या विक्रीसाठी स्टॉल / जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टसमध्ये महिला पर्यटकांसाठी विशेष सुविधा दिल्या जातील. महिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी अनुभवात्मक टूर पॅकेजेस.

महिला केंद्रित पर्यटन धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता पर्यटन संचालनालयामध्ये महिला पर्यटन धोरण*

कक्ष स्थापन करण्यात येईल. महिलांना पर्यटन क्षेत्रामध्ये व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी तयार करण्यात आलेल्या आई” या महिला केंद्रित / लिंग समावेशक पर्यटन धोरण राबविण्यासाठी वार्षिक कृती आराखडा निश्चित करुन त्याकरीता स्वतंत्र लेखाशिर्ष निर्माण करुन विभागाकडे उपलब्ध अर्थसंकल्पिय तरतुदीमधून पुनर्विनियोजना व्दारे आवश्यक वित्तीय तरतूद मान्यता देण्यात येत आहे.

याबाबतचा शासननिर्णय महाराष्ट्र शासनाच्या http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक 202306191644013323 असा आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page