या मुलींना डांबून ठेवणाऱ्या किशोर प्रसाद सेवाल साव, सुरंदर महादेव यादव या दोघांना देखील अटक केली…
नवी मुंबईत ऑनलाईन सेक्स रॅकेट: १५ मुलींची सुटका; तीन दलालांसह चौघे अटकेत…
नवी मुंबई : नवी मुंबई परिसरात ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणारी टोळी उद्ध्वस्त करण्याची कामगीरी नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणारे तीन दलाल व लॉजच्या मॅनेजर अशा चौघांना अटक केली आहे. तसेच या दलालांनी वेश्याव्यवसायासाठी शिरवणे येथील एका घरामध्ये डांबून ठेवलेल्या १५ महिलांची सुटका केली आहे. मागील दोन महिन्यांपासून नेरूळच्या शिरवणे भागात सदर ऑनलाईन सेक्स रॅकेट सुरू होते.
या कारवाईत अटक करण्यात आलेल्यामध्ये किशोर प्रसाद सेवाल साव (४६), सुरंदर महादेव यादव व साहिल उर्फ शाहिन सिराजुल मंडळ या दलालांचा व राज ईन लॉजचा मॅनेजर पुरुषोत्तम शेट्टी या चौघांचा समावेश आहे. यातील तिघा दलालांनी नेरूळ परिसरात ऑनलाईन साइटद्वारे सेक्स रॅकेट सुरू केले होते. त्यासाठी त्यांनी राज ईन लॉजच्या चालक-मालकासोबत संगनमत केले होते. एखाद्या ग्राहकाने ऑनलाईन साईटवर असलेल्या मोबाईलवर कॉल केल्यास हे दलाल त्यांना दुसऱ्या मोबाईलवरून व्हॉट्सॲपद्वारे चॅटींग करून त्यांना वेश्यागमनासाठी मुलींचे फोटो दाखवत होते. ग्राहकांने मुलगी पसंत केल्यानंतर त्याला राज ईन लॉजमध्ये वेश्यागमनासाठी मुलीला पाठवून देत होते. या सेक्स रॅकेटची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाल्यानंतर एएचटीयुच्या पथकाने गत गुरुवारी सायंकाळी बनावट ग्राहकांच्या सहाय्याने दलालाला ऑनलाईन साइटद्वारे संपर्क साधला होता. त्यानंतर साहिल उर्फ शाहिन सिराजुल मंडळ याच्यामार्फत तीन मुलींना शिरवणे येथील राज ईन लॉजमध्ये वेश्यागमनासाठी पाठवून दिले होते. त्यासाठी बनावट ग्राहकाकडून ३ हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक शरद भरगुडे व त्यांच्या पथकाने सदर लॉजवर छापा मारून वेश्यागमनासाठी लॉजमध्ये आणलेल्या तीन मुलींची सुटका केली. तसेच दलाल साहिल व लॉज मॅनेजर प्रभाकर शोट्टी या दोघांना अटक केली.
त्यानंतर पोलिसांनी सुटका केलेल्या पीडित मुलींकडे चौकशी केली असता, सदर दलालांनी शिरवणे येथील एका घरामध्ये वेश्याव्यवसायासाठी आणखी १२ मुलींना डांबून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शिरवणे येथील सदर घरावर छापा मारुन त्याठिकाणावरून १२ मुलींची सुटका केली. तसेच या मुलींना डांबून ठेवणाऱ्या किशोर प्रसाद सेवाल साव, सुरंदर महादेव यादव या दोघांना देखील अटक केली. मागील दोन महिन्यांपासून या टोळीने सेक्स रॅकेट सुरू केल्याचे तपासात आढळून आले आहे.