२०२४ या वर्षीची , चार धाम यात्रा 10 मे रोजी गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथ या ठिकाणी सुरू होईल तर १२ मे रोजी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे ( कपाट) उघडतील.
चार धाम यात्रेला हिंदू धर्मात गहन आध्यात्मिक महत्त्व आहे. हा प्रवास सामान्यतः एप्रिल/मे ते ऑक्टोबर/नोव्हेंबर दरम्यान होतो. गेल्या आठवड्यात चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी हिमांशू खुराना यांनी बद्रीनाथ धामला भेट देऊन चारधाम यात्रेच्या तयारीची पाहणी केली. उत्तराखंड पर्यटन विभागाने चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू केले आहे. उत्तराखंडमधील चार धाम बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आजपासून (१५ एप्रिल) सुरू झाली आहे. आज सकाळी ७ वाजल्यापासून यात्रेकरूंना वेबसाइट, ॲप, व्हॉट्सॲप आणि टोल फ्री क्रमांकावर नोंदणी करता येणार आहे. या यात्रेवर जाणाऱ्या भाविकांनी आपले रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन या विभागाने केले आहे.
चार-धाम यात्रेत बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चार मंदिरांना भेट दिली जाते आणि या मुळेच या यात्रेला चारधाम यात्रा म्हटले जाते. जीवनात एकदा तरी अवश्य चारधाम यात्रा करावी अशी हिंदूंची श्रद्धा आहे.
यात्रा सुरू होण्यापूर्वी सीवर लाईन दुरुस्ती, अंतर्गत मार्गांची सुधारणा, पाणी, वीज, पथदिवे व वाहन पार्किंगची कामे पूर्ण करून तेथे आवश्यक त्या सोयी पुरवण्यात आल्या आहेत. चारधाम यात्रेतील ही स्थळे वर्षातील सहा महिने बंद असतात आणि केवळ सहा महिनेच सुरू असतात. चार धाम यात्रा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पूर्ण करावी असे मानले जाते. म्हणून, तीर्थयात्रा यमुनोत्रीपासून सुरू होते, गंगोत्रीकडे जाते, केदारनाथपर्यंत जाते आणि शेवटी बद्रीनाथ येथे संपते.