
मुंबई : भाजपाने त्यांच्या ‘एनडीए’ गटाची दिल्लीत बैठक घेतली .यावरून एकेकाळी एनडीएत शिवसेना, अकाली दल, जनता दल युनायटेड इतकेच काय, तर तृणमूल काँग्रेस, द्रमुकसारखे बलाढ्य पक्ष होते, पण आज एनडीएच्या व्यासपीठावर सगळी सुकलेली केळी व इथून तिथून उपटलेली रोपटीच दिसत होती, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2024साठी एनडीएचा जीर्णोद्धार करावा लागला याचा अर्थ असा की, भाजपा व मोदी यांची ताकद, लोकप्रियता घटली आहे. भाजपाला आता स्वबळावर निवडणुका लढणे कठीण होत आहे. त्यामुळेच त्यांना नाइलाजाने ‘एनडीए’ची मोट बांधून भ्रष्टाचाराचे डाग असलेल्या कलंकितांना सोबत घ्यावे लागले, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात करण्यात आली आहे.
दरम्यान आपल्या राजकीय विरोधकांवर घाणेरडे आरोप करण्याआधी स्वतःच्या आजूबाजूला एकदा कटाक्ष टाकावा. नव्या ‘एनडीए’त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या फुटीर गटास बोलावले. त्यांच्या पक्षाचा फैसला अद्यापि व्हायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने तर शिंदे व त्यांचा गटच अपात्र ठरवला आहे. अजित पवार गटाचेही तेच हाल होतील. अशा घटनाबाह्य लोकांना एकत्र करून मोदी ‘इंडिया’शी लढू पाहत आहेत. हीच त्यांची हतबलता व एक प्रकारची मजबुरी आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
भाजपाने त्यांच्या ‘एनडीए’ गटाची दिल्लीत बैठक घेतली. कालपर्यंत या मंडळींनी ‘एनडीए’चा कचरा करून उकिरड्यावर फेकला होता. ‘मोदींचे सरकार’, ‘भाजपाचे सरकार’ असा ढोल वाजत होता. ‘भाजपा यावेळी 400 पार’ अशा घोषणा होत्या, पण ‘इंडिया’ संघास मिळणारा पाठिंबा पाहून याच लोकांनी गतप्राण करून ठेवलेल्या ‘एनडीए’त जान फुंकण्याचा प्रयत्न झाला. जे लोक एनडीए संपवायला निघाले होते त्यांना पुन्हा ‘एनडीए’ निर्माण करावी लागली हाच ‘इंडिया’ संघाचा पहिला विजयी षटकार आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे