आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने श्रीक्षेत्र मार्लेश्वरच्या पर्यटन विकासाला मिळणार गती,पर्यटनमंत्री श्री. शंभूराजे देसाई यांच्याशी सकारात्मक चर्चा….

Spread the love

*देवरुख-* संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र मार्लेश्वर देवस्थानाच्या विकासासाठी आमदार शेखर निकम यांनी पर्यटन मंत्री मा. श्री. शंभूराजे देसाई साहेब यांची भेट घेतली. या चर्चेत मार्लेश्वर परिसराच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्याची विनंती करण्यात आली.

उंच डोंगरावर वसलेले श्री मार्लेश्वर हे श्रीशंकराचे जागृत देवस्थान आहे. सह्याद्री पर्वतरांगा, वर्षभर वाहणारे धबधबे आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे भाविकांसाठी हे ठिकाण धार्मिक तसेच पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठरते. दरवर्षी महाराष्ट्रभरातून हजारो पर्यटक आणि भाविक येथे येतात. मार्लेश्वर परिसरात आवश्यक पर्यटन सुविधा, सुशोभीकरण, पार्किंग व्यवस्था, रस्ते विकास, स्वच्छतागृहे, वीज व पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या कारणांमुळे भाविक व पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

आमदार शेखर निकम यांनी प्रादेशिक पर्यटन अंतर्गत १० कोटी रुपये निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे.* या निधीतून मंदिर परिसराचा विकास, धबधब्याच्या ठिकाणी संरक्षक सुविधा, निसर्ग पर्यटनासाठी विशेष जोतींची उभारणी, व पर्यटकांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना राबवता येतील. पर्यटन मंत्री मा. श्री. शंभूराजे देसाई साहेब यांनी या प्रस्तावावर सकारात्मकता दर्शवत, लवकरच संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी श्रीक्षेत्र मार्लेश्वराला स्वतः भेट देण्याची तयारीही व्यक्त केली आहे.

श्रीक्षेत्र मार्लेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी मंजूर होणारा निधी फक्त धार्मिक पर्यटनालाच नव्हे, तर स्थानिक रोजगार निर्मितीलाही चालना देणार आहे. परिसरातील युवा व उद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण होतील. आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांनी चिपळूण-संगमेश्वर भागातील पर्यटनाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे. “कोकण पर्यटनाच्या विकासासाठी शासनाचा निधी उपयोगात आणून स्थानिक पातळीवर बदल घडवणे हाच उद्देश आहे, असे शेखर निकम यांनी सांगितले. या महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पामुळे श्रीक्षेत्र मार्लेश्वर लवकरच एक प्रगत पर्यटनस्थळ म्हणून उभे राहील.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page