पुणे : नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) अंदमानात दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने रविवारी दिली. उन्हाच्या चटक्यांत होरपळून निघालेल्या आणि पाण्यासाठी दाही दिशा, अशी स्थिती झालेली असताना हवामान खात्याने ही आनंदाची बातमी दिली आहे.
राज्यात या वर्षी उन्हाचा चटका वाढला असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने राज्याच्या बहुतांश भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यामुळे यंदाच्या मॉन्सूनच्या वाटचालीकडे प्रत्येकाचे डोळे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ही दिलासा देणारी बातमी दिली आहे.
मॉन्सून रविवारी (ता. १९) अंदमानच्या दक्षिण भागात हजेरी लावेल, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वी दिला होता. त्यानुसार आता मॉन्सूनने तेथे वर्दी दिल्याचे खात्याने रविवारी जाहीर केले. दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सूनने पुढे वाटचाल सुरू केली. अंदमानात दाखल झालेला मॉन्सून केरळमध्ये शुक्रवारपर्यंत (ता. ३१) दाखल होण्याची शक्यताही खात्याने दोन दिवसांपूर्वी दिली आहे. त्याच वेळी अरबी समुद्रातही मॉन्सूनने प्रगती केली आहे. तेथे मालदिव आणि कोमोरिन भागात मॉन्सून दाखल झाल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.
🔹️या निकषावर जाहीर केले मॉन्सूनचे आगमन..
दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून तीन किलोमीटर उंचीपर्यंत वाहणारे वारे
पश्चिमेकडून वाहणारे वाऱ्यांचे प्रवाह
उंचीवरून वाहणारे नैर्ऋत्येकडील प्रवाह
आकाशात परावर्तित होणारी किरणोत्सर्गी ढगांची दाटी
पावसाची हजेरी
🔹️तळकोकणात सहा जूनला वर्दी
अंदमानमध्ये पहिली सलामी दिल्यानंतर मॉन्सून पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये केरळमध्ये हजेरी लावतो. मॉन्सून सामान्यतः एक जूनला केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर उत्तरेकडे प्रवास करत कर्नाटक, गोव्यानंतर तळकोकणात वर्दी देतो. सरासरी दिवसांप्रमाणे राज्यात सहा जूनला मॉन्सून बरसतो. या वर्षीही मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण असल्याने वेळेवर मॉन्सून राज्यात हजेरी लावेल, असा अंदाज आहे.
🔹️मॉन्सूनची प्रगती-
दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मॉन्सून साधारणत: २१ मे पर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोचतो, तर २२ मे रोजी अंदमान बेटसमूह व्यापतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. अंदमानात दाखल झाल्यानंतर अरबी समुद्रात साधारणतः २६ मे रोजी पोचणारा मॉन्सून यंदा १९ मे रोजी मालदीव बेटे आणि दक्षिण भारत आणि श्रीलंकेजवळ असलेल्या कोमोरीन भागात दाखल झाला आहे.
🔹️‘एन निनो’ होतोय तटस्थ-
देशात यंदाच्या पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) १०६ टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मॉन्सूनवर प्रभाव पाडणारा प्रशांत महासागरात उष्ण पाण्याचा प्रभाव असलेला ‘एन निनो’ची तीव्रता कमी होत आहे. तो तटस्थ होत असून, तेथे थंड पाण्याचा प्रभाव असलेली ‘ला निना’ स्थिती तयार होत असल्याची शक्यता खात्याने वर्तविली आहे.
🔹️मॉन्सूनचे अंदमानातील आगमन..
🔸️वर्ष-आगमन-
▪️२०१९-१८ मे
▪️२०२०-१७ मे
▪️२०२१-२१ मे
▪️२०२२-१६ मे
▪️२०२३-१९ मे
▪️२०२४-१९ मे