
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदावर नयोमी दशरथ साटम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांची बदली झाल्याने हे पद गेले काही दिवस रिक्त झाले होते.आता या पदावर नयोमी साटम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नयोमी साटम या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वरवडे फळसेवाडी येथील रहिवासी आहेत. परंतु सध्या त्या मुंबईतील बोरवली (पूर्व)येथे स्थायिक असून २०२१ च्या बॅचच्या अधिकारी आहेत.
तसेच नयोमी साटम या सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. ऋषिकेश रावले यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर नयोमी साटम या लवकरच रुजू होणार आहेत.नयोमी साटम यांचे प्राथमिक शिक्षण दहिसर मुंबई येथे झाले.
सेंट जेवियर कॉलेजमधून इकॉनॉमिक्स या विषयातून 2019 मध्ये त्यांनी पदवी संपादन केली.पदवी संपादन करतानाच त्यांनी यूपीएससीची परीक्षा देण्याचे निश्चित केले होते.
पदवीधर होताच त्यांनी बेंगलोर येथे यूपीएससीसाठी क्लास जॉईन केला. त्यावेळी कोरोना मुळे त्यांना क्लास सोडून पुन्हा मुंबईला परतावे लागले होते..मात्र त्याही परिस्थितीत त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करत 2020 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच यूपीएससी परीक्षा दिली त्या परीक्षेत त्या 162 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. सिंधू कन्येची सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.