नवी दिल्ली : – मणिपूर हिंसाचारावरून विरोधकांनी लोकसभेत आज अविश्वास प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावेळी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून खासदार श्रीकांत शिंदे, ठाकरेंकडून अरविंद सावंत तर भाजपाकडून मंत्री नारायण राणे बोलायला उभे राहिले. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या भाषणात हिंदुत्व आणि गद्दारीवरून ठाकरे गटाला टोला लगावला. तर अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला पळपुटे म्हटलं. सावंतांच्या भाषणानंतर नारायण राणे यांनी शिंदे गटाची बाजू घेत ठाकरे गटाच्या खासदारांना इशारा दिला.
सुरुवातीला श्रीकांत शिंदे म्हणाले की, काही लोक गद्दारांसोबत अमित शाह बसलेत असं बोलतात, पण २०१९ च्या निवडणुकीत तुम्ही कोणाचे फोटो दाखवून निवडून आला? सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार दावणीला बांधले. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असं बाळासाहेब बोलायचे. निवडणूक एकासोबत लढली आणि खुर्चीसाठी विचार बाजूला ठेवत अनैतिक सरकार बनवले. काँग्रेससोबत शिवसेनेची युती होईल असं कुणाला वाटले नाही. लोकांसोबत गद्दारी करण्याचे काम काँग्रेससोबत जाणाऱ्यांनी केले. १३ कोटी जनतेशी गद्दारी केली. ज्यांनी कारसेवकांवर गोळी चालवण्याचे काम केले त्यांच्यासोबत गेले. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना यांनी जेलमध्ये टाकले. शिवसेना म्हणून आम्ही सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास ठरावाचा विरोध करतो असं म्हटलं. श्रीकांत शिंदे यांनी भाषणात संपूर्ण हनुमान चालीसाही बोलून दाखवली.
तर हे सरकार संवेदनहिन आहे. आज ९ वर्ष झाली, बीएसएनल बुडतोय, रोजगार जातोय, महिलांवर अत्याचार होतोय. सोशल मीडियावर द्वेषाचे राजकारण पसरवलं जातंय, आम्ही मणिपूरला गेलोय, तिथला हिंसाचार बघितलाय, त्यावरही राजकारण होतंय, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर ३० सेकंदांसाठी पंतप्रधान बोलतायत , जे पळपुटे आहेत त्यांनी हिंदुत्वावर भाष्य करू नये. मंदिरातील घंटा वाजवणारा हिंदू नको, दहशतवाद्यांना मारणारा हिंदू हवा असं बाळासाहेब म्हणायचे. मणिपूर असो वा हिंदुत्व, ज्यांचे नाव घेऊन पंतप्रधानांनी नॅचरल करप्ट पार्टी असं संबोधले. ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला त्यातील सर्व महाराष्ट्रातील सरकारमध्ये सहभागी झाले आणि मंत्रीही झाले. पळपुटे राष्ट्रीयत्वाबद्दल बोलणार? मणिपूरबाबत न्यायालयाने फटकारल्यानंतर मोदी बोलले. पळपुटे लोक आम्हाला हिंदुत्वाबद्दल काय शिकवणार असा सवाल करत अरविंद सावंत यांनी श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला.
दरम्यान, या भाषणानंतर मंत्री नारायण राणे बोलायला उभे राहिले तेव्हा राणे आणि ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अविश्वास प्रस्तावावर अनेकांची भाषणे ऐकली, आत्ताच अरविंद सावंत यांचे भाषण ऐकताना मी दिल्लीत नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेत बसलोय असं वाटलं. अविश्वास प्रस्तावावर सावंतांनी श्रीकांत शिंदेंना उत्तर देण्याचे काम केले. हिंदुत्वाची भाषा केली. उद्धव ठाकरे गटाचे हिंदुत्वाबाबत बोलले. हिंदुत्वाबद्दल इतकं प्रेम होतं मग २०१९ मध्ये सत्तेसाठी शरद पवारांसोबत गेले तेव्हा हिंदुत्व आठवलं नाही का? हिंदुत्व आणि खरी शिवसेनेबाबत बोलतात पण अरविंद सावंत शिवसेनेत कधी आले? मी १९६६ चा शिवसैनिक आहे. हे आम्हाला शिवसेनेबाबत बोलणार का? मी पक्ष सोडला, २२० लोकांनी आंदोलन केले होते. आता काहीच शिल्लक नाही. आता आवाज येतोय तो मांजराचा आहे, वाघाचा नाही. पंतप्रधानांवर बोलण्याची त्यांची औकात नाही. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याकडे बोट दाखवाल तर तुमची औकात दाखवू असा इशारा राणेंनी दिला. राणेंच्या भाषणावेळी ठाकरे गटाच्या खासदारांनी त्यांच्यावर आरोप लावले तेव्हा राणे भडकले. त्यांनी त्यांच्याकडे बघून इशारा दिला तेव्हा लोकसभा सभापतींनी वैयक्तिक बोलू नका, माझ्याकडे बघून भाषण करा अशी सूचना राणेंना केली.