
दिल्ली- नितीन गडकरी देशाच्या राजकारणातील सर्वात मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी त्यांची ख्याती आहे. देशाच्या विकास कामासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा रंजक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या सिनेमाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या सिनेमाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या सिनेमाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. ‘गडकरी’मध्ये नितीन गडकरींची मुख्य भूमिका कोण साकारणार आहे? या मुख्य भूमिकेत नेमकं कोण बघायला मिळणार आहे, यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून लवकरच याचा मोठा खुलासा होणार आहे.

सिनेमाबद्दल दिग्दर्शक अनुराग भुसारी यांनी सांगितले आहे की, ‘’ नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकिर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या अनेक बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे.
मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक असणार आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आला आहे. २७ ॲाक्टोबर दिवशी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे.