नवी दिल्ली- गेल्या 15 वर्षांपासून रखडलेला मुंबई -गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार हा प्रश्न प्रत्येक कोकणवासियांना पडला आहे. गणपती, होळी, शिमगा या सणांसाठी रस्तेमार्गे गावी जाणार्या चाकरमान्यांना कोकणात जाणे खूप त्रासदायक ठरते. महामार्गाचे काम सुरू असल्यामुळं अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे तर, कधी कधी कामामुळं वाहतूक कोंडीचा सामनादेखील करावा लागतो. मात्र आता मुंबई-गोवा महामार्गाचे काम जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. उत्तर-मध्य मुंबई लोकसभेसाठी उज्वल निकम रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत नितीन गडकरी बोलत होते. चिपळूणचा उड्डाणपूल सोडून मुंबई-गोवा महामार्गाचे संपूर्ण काम जूनअखेरीस पूर्ण होणार आहे, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबईतून गोव्याला पोहोचणे पाच तासांत शक्य होणार आहे, असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.
गडकरी यांनी म्हटलं आहे की, कोकणातील नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही बीपीटीमधून रोरो सेवा सुरू केली आहे. त्यामुळं तुम्ही वाहने थेट रोरोद्वारे अलिबागला घेऊन जाऊ शकता. अलिबागहून मुंबई-गोवा महामार्गाला तुम्ही जोडले जाऊ शकता. मुंबईतून अलिबाग जो प्रवास रस्ते मार्गे साडेतीन तासांचा आहे तो रो-रो मुळं 45 मिनिटांत होतो. यामुळं कोकणातून मुंबईत व्यावसायिकांसाठी येणार्या व्यापार्यांचा प्रवास सोप्पा होणार आहे. विरार-दिल्ली महामार्गाचे काम एनएचआयच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हा महामार्ग थेट जेएनपीटीपर्यंत जाणार आहे. या महामार्गामुळं तरुणांना रोजगार निर्माण होणार आहे. तसंच, त्या भागातील गरिबी दूर होते, असंही गडकरी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होऊ शकते. अशावेळी त्या अगोदर मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले तर त्याचा फायदा प्रवाशांना होईल. कित्येकदा महामार्गाच्या कामांमुळं कित्येक तास ट्रॅफिकमध्ये अडकून बसावे लागते. त्यामुळं प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. अशातच जर गणेशोत्सवाच्या आधी महामार्ग सुरू झाला तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यंदा 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी असून 16 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असणार आहे. त्यामुळं यंदा तरी चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करता येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.