
मुंबई- भारतीय जनता पक्षाचे मंत्री नीतेश राणे आणि त्यांचे बंधू शिवसेना आमदार नीलेश राणे यांच्यात काही दिवसांपूर्वीच शीतयुद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचाच पुढचा अध्याय पुन्हा एकदा दिसून आला. मंत्री नीतेश राणे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून नीलेश राणे यांना युती धर्माची आठवण करून दिली आहे. इतकेच नाही तर नीतेश राणे यांनी एका कार्यकर्त्याचा व्हाट्सअप चॅटचा स्क्रीन शॉट देखील शेअर करत महायुतीमधील कार्यकर्त्यांना धमकावणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मंत्री नीतेशराणे आणि त्यांचे बंधू शिवसेना आमदार नीलेश राणे यांच्यात हे शीतयुद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नीतेश राणे यांनी धाराशिव मधील एका पक्षाच्या मेळाव्यात कोणीही कितीही ताकद दाखवली, कोणी कसेही नाचले तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच राहतील. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राहतील, हे लक्षात ठेवा. मुख्यमंत्री पदावर बसलेला नेता हा भाजपचा असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवसेनेचे कुडाळचे आमदार आणि मंत्री नीतेश राणे यांची बंधू नीलेश राणे यांनी नीतेश राणे यांना एक सल्ला दिला होता. या संबंधितांनी एका पोस्टच्या माध्यमातून राणे यांना आपण युतीचा भाग असल्याची आठवण करून दिली होती. त्यामुळे दोन्ही भावांमध्ये चांगलाच वाद पेटल्याचे पाहायला मिळाले होते.
आता पुन्हा एकदा नीतेशराणे यांनी नीलेश राणे यांना उद्देशून सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे. त्यामुळे आता या पोस्टला आमदार नीलेश राणे कशा पद्धतीने उत्तर देतात, हे पहावे लागणार आहे. या दोन भावांमधील वाद आता सोशल मीडियावर होत असल्याने या विषयी राज्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
फडणवीस, नारायण राणे यांनी देखील दिली होती समज…
मंत्री नीतेशराणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील नीतेशराणे यांना समज दिली होती. या संदर्भात नीतेशराणे यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यातच आता या दोन्ही राणे बंधूंमधील वाद अशा प्रकारे समोर आला आहे. त्यामुळे आता या घटना घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.