कुडाळ :- राजकारणात मन रमत नाही म्हणून काही जणांनी राजीनामा दिला होता. राजकारण, समाजकारण हे मन रमण्यासाठी नसते. ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असते, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेते निलेश राणे यांना लगावला. निलेश राणेंनी आता पळ न काढता निवडणूक लढवावी असे खुले आव्हान नाईक यांनी दिले आहे .
निलेश राणे कोणत्याच पक्षाचे नेतृत्व मानत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ते पक्षाच्या नेतृत्वाचा विश्वास कधीही संपादन करू शकत नाहीत, अशी टीका आमदार नाईक यांनी करताना ते म्हणाले, ‘‘लोकप्रतिनिधी हा आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा किंवा कुरघोडीचा वापर करीत नाही तर लोकांचे प्रश्न सोडवण्याचे जो प्रयत्न करीत असतो तो लोकप्रतिनिधी होय. जर केंद्रीय मंत्र्यांच्या चिरंजीवांचे राजकारणात मन रमत नसेल किंवा ते नाराज होत असतील तर अच्छे दिन नक्की कोणाचे आलेत हा प्रश्न सिंधुदुर्गवासियांना किंवा येथील जनतेला पडला आहे. भाजप आणि निलेश राणे यांच्या कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. त्यांना त्यांच्याच पक्षातून विरोध असून त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पेपरमधून पाच-पाच इच्छुक उमेदवारांचे फोटो झळकले. २०१९ मध्ये त्यांच्याच वडिलांनी निवडणुकीतून पळ काढला होता. निलेश राणेंनी आता पळ न काढता निवडणूक लढवावी. लोकशाही मार्गाने लोक कोणाला ते स्वीकारतील. आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकू. भाजपमध्ये अच्छे दिन कोणाचेच नाहीत. आज निलेश राणे विकासकामे होत नाहीत किंवा त्यांना मानसन्मान दिला जात नाही, असे सांगत असतील तर ते केंद्रीय मंत्र्यांचे मुलगे किंवा त्यांचे बंधू भाजपचे प्रवक्ते आहेत. जर निलेश राणेंचे राजकारणात मन रमत नाही म्हणून राजीनामा देत असतील किंवा भाजप त्यांना डावलत असेल तर भाजपचे अच्छे दिन कुठे आहेत? त्यामुळे लोकांसाठी भाजपने अच्छे दिन आणलेच नाहीत, असेही टीका आमदार नाईक यांनी केली.