जालना- मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात उपोषण सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषण स्थळी येत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सोडवले. यावेळी मनोज जरांगे पाटलांनी त्यांना 40 दिवसांचा कालावधी दिला आहे. 17 दिवसांनंतर मनोज जरांगे यांचे उपोषण सुटले असून त्यांनी दवाखान्यात दाखल होण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विनंती देखील मान्य केली आहे. त्यानुसार मनोज जरांगे आता दवाखान्यात उपचार घेणार आहेत.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या या निर्णयानंतर दिव्य मराठीने त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला असून त्यांनी मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहणारे व्यक्तिमत्व असून ते आरक्षण मिळेपर्यंत घरी येणार नाही असे सांगितले आहे. तर त्यांच्या मुलाने आणि मुलीने पप्पा घरी येणार नाही, यांचे दु:ख असले तरी ते समाजासाठी काम करताय आणि मुख्यमंत्र्यांनी लवकर मागण्या मान्य कराव्या असे मत व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी लवकर मागण्या पूर्ण कराव्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषण सोडले पण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या असे मत मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नी सौ. सोमित्रा मनोज जरांगे यांनी व्यक्त केले आहे. तर आंदोलन सुरू झाल्यापासून त्यांच्याशरी आपले बोलणे झाले नाही. ते शब्दांचे पक्के असल्याने ते घरी येतील की नाही हे मी सांगू शकत नाही. आम्ही त्यांच्या शब्दांच्या पुढे जाणार नाही.
40 दिवसांनी आम्हाला आरक्षण मिळेल
मनोज जरांगे पाटील यांची कन्या पल्लवी म्हणाली की, स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज येऊन भेटले तर आता 40 दिवसांनी आम्हाला आरक्षण मिळेल असा विश्वास आहे. एकनाथ शिंदे आमच्या समाजाला समजून घेतील. माझ्या पप्पांनी घरी आले पाहिजे असे मला मुलगी म्हणून वाटत असले तरी पप्पांनी सांगितले आहे मी बाहेर असे पर्यंत समाजाचा आहे. त्यामुळे ते आरक्षण भेटेपर्यंत घरी येणार नाही. पप्पा आम्हाला वेळ देऊ शकत नाही कारण ते त्यांचा पूर्ण वेळ हा समाजासाठी देत आहे.
उपोषण सोडल्यामुळे मी खूप आंनदी
मनोज जरांगे पाटलांचे सुपुत्र शिवराज म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या पप्पाचे उपोषण सोडल्यामुळे मी खूप आंनदी आहे. पप्पाच्या आंदोलनामुळे सरकारने काहीतरी पाऊले उचलायला सुरूवात केली याचा मला अभिमान वाटतो. सकल मराठा समाज मुख्यमंत्री शिंदेंकडे आशेणे पाहत आहे.
शिवराज म्हणाले की, ज्या मागण्या प्रलंबित आहे त्या मार्गी लावणे हे पप्पाचे प्रथम कर्तव्य आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मी त्यांना काही बोलू शकत नाही. आंदोलनामुळे गेली अनेक दिवस माझ्याशी त्यांचे बोलणे झाले नाही. वडील घरी येणार नाही यांचे जरी दु:ख असले तरी समाजासाठी त्यांचे आमरण उपोषण सोडले हे महत्त्वाचे आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबाने त्यांना मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठीसंपूर्णपणे पाठिंबा दिला आहे. ते आम्हाला भेटले नाही यांचे दु:ख होत असले तरी ते समाजासाठी वेळ देत आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत ते घरी येणार नाही, कारण ते शब्दांचे पक्के आहेत असा विश्वास त्यांच्या कुटुंबाने व्यक्त केला आहे.