
SA vs NED : नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेच्या नाकी नऊ आणले होते. एक तर त्यांनी २४५ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेची ४ बाद ४४ अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर नेमकं काय घडलं जाणून घ्या…
धरमशाला : नेदरलँड्सच्या संघाने दक्षिण आफ्रिकेसरख्या दिग्गज संघाला चांगलेच वेठीस धरले होते. कर्णधार स्कॉट ए़डवर्ड्सने झुंजार ७८ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेची ४ बाद ४४ अशी दयनीय अवस्था केली होती. त्यामुळे नेदरलँड्सच्या संघाने विजयाचा पाया रचला होता. त्यानंतर नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेची ९ बाद १६६ अशी अवस्था केली होती आणि ते विजयापासून फक्त एका पावलावर होते. पण नेदरलँड्सने हे मोठे पाऊल टाकले आणि विजयासह इतिहास रचला. कारण यापूर्वी वर्ल्ड कपमध्ये कोणत्याही दिग्गज संघाला त्यांना नमवता आले नव्हते.
नेदंरलँड्सच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण त्यांना सुरुवातापासून एकामागून एक धक्के बसायला सुरुवात झाली होती. आठव्या षटकात त्यांची २ बाद २४ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर त्यांचा अर्धा संघ ८२ धावांत तंबूत परतला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ आपला अनुभव पणाला लावेल आणि नेदरलँड्सला लवकर सर्व बाद करेल, असे सर्वांना वाटले होते. पण त्यावेळी फक्त एकच खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या संघाला भिडल्याचे पाहायला मिळाले. या एका खेळाडूने त्यावेळी जी फलंदाजी केली त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने यावेळी मोठी संधी गमावल्याचे पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न धुळीस मिळवणारा हा खेळाडू होता नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स. स्कॉटने यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. स्कॉटने फक्त संघाची पडझड थांबली नाही तर त्याने झंझावाती खेळी साकारली. त्याच्या या खेळीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना लोटांगण घालावे लागले. कारण स्कॉटने यावेळी फक्त ६९ चेंडूंत १० चौकार व एका षटकाराच्या जोरावर ७८ धावांची दणदणीत खेळी साकारली. या स्कॉटच्या खेळीमुळे नेदरलँड्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ४३ षटकांत ८ बाद २४५ अशी आव्हानात्मक धावसंख्य उभारण्यात आली. हा सामना सुरु होण्यापूर्वी पाऊस पडला होता. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमांनुसार हा सामना ४३ षटकांचा खेळवण्यात आला होता.

नेदरलँड्च्या २४६ धावांचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरला खरा, पण त्यांची ४ बाद ४४ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे यावेळी दक्षिण आफ्रिकेची मदार यावेळी फक्त डेव्हिड मिलरवर होती. पण मिलर यावेळी ४३ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे काय होणार, याची चर्चा सुरु झाली. मिलर बाद झाल्यावर हा सामान दक्षिण आफ्रिकेच्या हातून निसटला आणि नेदरलँड्सने सर्वात मोठा विजय साकारला.