नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन सुरू, ग्रामपंचायतीशी चर्चा ठरली निष्फळ, कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम….

Spread the love

नेरळ: सुमित क्षीरसागर – नेरळ ग्रामपंचायत मधील सफाई कर्मचारी यांचे ९ महिन्याचे वेतन थकीत आहे. अशात ग्रामपंचायत नेरळ यांना मनसे महापालिका कामगार सेनेकडून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्यावर तोडगा न निघाल्याने आजपासून नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी यांनी नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. तर कामगारांच्या थकीत वेतनाबाबत नेरळ ग्रामपंचायत येथे कामगारांच्या शिष्टमंडळाकडून चर्चा करण्यात आली मात्र किमान ६ थकीत पगार करा अशा भूमिकेवर कामगार ठाम राहिले असल्याने ती चर्चा निष्फळ ठरली आहे.

जिल्ह्यातील आर्थिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सगळ्यात मोठी असलेली नेरळ ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती नाजूक आहे. तर मागील वर्षभरात ग्रामपंचायतीची वसुली देखील झालेली नाही. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीच्या तिजोरीत खडखडाट आहे. तेव्हा ग्रामपंचायतीतील कार्यरत आरोग्य कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी, दिवाबत्ती कर्मचारी यांचे गेली ९ महिन्यापासून वेतन थकलेले आहे. तसेच बँकेतून घेतलेल्या कर्जापोटी ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली बँकेच्या हप्त्याची रक्कम बँकेत जमा न केल्याची बाब देखील समोर आली आहे. यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली प्राव्हिउंट फंडाची रक्कम पोस्टात न भरणे अशा अनेक समस्यांनी ग्रामपंचायत कर्मचारी हैराण झाले आहेत. त्यामुळे आता सर्व कमर्चारी यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी सेनेच्या नेरळ ग्रामपंचायत येथील युनिटने नेरळ ग्रामपंचायतीला  १० मार्च पर्यंतची मुदत दिली होती. मात्र या मुदतीत कामगारांचे प्रश्न निकाली निघाले नसल्याने आज दिनांक ११ मार्च पासून नेरळ ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, या ठिकाणी अनियमित काम बंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान याबाबत नेरळ ग्रामपंचायत येथे आंदोलन सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळास चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले होते. शिष्टमंडळाकडून कामगारांचे किमान ६ पगार ग्रामपंचायतीने करावे अशी मागणी ठेवण्यात आली. मात्र ग्रामपंचायत महिन्याला दोन पगार करेल आपण आम्हाला मुदत द्या अशी विनंती उपसरपंच मंगेश म्हसकर यांनी केली. परंतु याअगोदर देखील लेखी आश्वासन नेरळ ग्रामपंचायतीने देऊन पूर्ण केले नाही तेव्हा आता देखील त्याची काही शाश्वती आहे का असा प्रश्न मनसेचे समीर चव्हाण यांनी केला. तेव्हा एकतर पगार करू किंवा राजीनामे देऊ अशी स्पष्ट भूमिका म्हसकर यांनी मांडली. मात्र कर्मचारी त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने आंदोलन सुरूच आहे. तर या मनसे महापालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुधाकर घारे , तालुकाध्यक्ष भगवान चंचे, महिला तालुकाध्यक्ष रंजना धुळे,आयुब तांबोळी,शिवसेना ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख सुरेश गोमारे, शहरप्रमुख हेमंत क्षीरसागर, संतोष सारंग, संदीप उत्तेकर,संजय मनवे,प्रीतम गोरी दीपक मोरे,विशाल साळुंके.यांनी भेट देत पाठिंबा जाहीर केला आहे.

दरम्यान घराचा आर्थिक गाडा चालवताना आम्हाला वेतन नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. बँकेचे कर्मचारी कर्जाच्या वसुलीसाठी दारात उभे राहतात हा त्रास आम्हाला होतो त्यामुळे ही भूमिका घेतली आहे आम्हाला नेरळच्या नागरिकांना त्रास द्यायचा नाही मात्र काम बंद आंदोलनामुळे त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी आंदोलक कामगारांनी व्यक्त केली आहे. तर आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
यावेळी शिष्टमंडळात मनसे महापालिका कामगार कर्मचारी संघटनेचे नेरळ युनिट अध्यक्ष सुभाष नाईक, मनसे जिल्हा सचिव अक्षय महाले, शहरप्रमुख हेमंत चव्हाण, मनसे महिला आघाडीच्या आकांक्षा शर्मा, समीर चव्हाण, आझाद समाज पार्टीचे उपाध्यक्ष सुमित साबळे, मुजम्मिल मणियार, नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर, ग्रामसेवक अरुण कारले, सदस्य संतोष शिंगाडे, शंकर घोडविंदे, श्रद्धा कराळे, गीतांजली देशमुख, जयश्री मानकामे, उमा खडे, शिवाली पोतदार, आदी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page