मुंबई- अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एसआरए प्रकल्पाच्या वादातून ही घटना घडल्याचे बोललं जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर ३ ते ४ राऊंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली. यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. फटाक्यांची आतिषबाजी सुरू असतानाच हल्लेखोरांनी संधी साधत बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती मिळत आहे.
आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच ही घटना घडली आहे. तोंडाला रुमाल बांधून तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून दोघांना अटक केली आहे. बाबा सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. पंधरा दिवासांपूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. आता त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. लिलावती रुग्णालयाच्या परिसरात आणि वांद्रे पूर्व परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू झाला आहे.
झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दिकी हे मुंबईतील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जात होते. तीन वेळा ते आमदार झाले आहेत. त्याशिवाय मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत. बाबा सिद्दिकी हे 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. 2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दिकी यांची नियुक्तीही केली होती. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांचा अशिष शेलार यांनी पराभव केला होता.
लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्वमधून आमदार आहेत. बाबा सिद्दिकी हे बांद्र्यातील मोठं प्रस्थ असून पूर्वी काँग्रेस पक्षात होते. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात त्यांनी प्रवेश केला होता. बाबा सिद्दिकी हे मुंबईतील नामवंत चेहऱ्यांपैकी एक असून ईद दरम्यान बाबा सिद्दिकी यांची ईफ्तार पार्टी हा संपूर्ण मुंबईसाठी नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. कारण आतापर्यंत त्यांच्या इफ्तार पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटी आणि बडे राजकारणी हजेरी लावत होते. तर सलमान आणि शाहरुखमधील दुरावादेखील त्यांच्या ईद पार्टीलाच दूर झाला होता. गेले अनेक वर्ष राजकारणातील मोठं नाव असणारे बाबा सिद्दीकी यांच्यावर कोणी आणि का हल्ला केलाय? याचं गूढ अजून उकललेलं नाही.