
चीनमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई खेळांत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खेळाडूंची भेट घेत त्यांचं कौतुक केलं.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी चीनमध्ये आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी भारतीय खेळाडूंची भेट घेतली. मोदींनी या खेळाडूंचं त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केलं.
खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. तसेच त्यांनी पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेत यापेक्षा चांगली कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला. भारतीय खेळाडूंनी हांगझोऊमध्ये आशियाई खेळांच्या इतिहासात आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. २८ सुवर्णांसह एकूण १०७ पदकं जिंकत भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानी राहिला. विशेष म्हणजे, यापैकी अर्धी पदकं महिला खेळाडूंनी जिंकली आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन.
आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचा गौरव करताना मोदी म्हणाले की, ‘खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. तुम्ही १०० पदकांचा टप्पा ओलांडला. पुढच्या वेळी आपण हा विक्रमही मागे टाकू. पॅरिस ऑलिम्पिकसाठी सर्वोत्तम प्रयत्न करा, असं ते म्हणाले. पुढील आशियाई खेळ २०२६ मध्ये जपानमध्ये होणार आहेत.
२०१४ नंतर बदल झाला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. भारतात प्रतिभेची कधीच कमतरता नव्हती. जिंकण्याची इच्छा कायम होती. ते याआधीही चांगली कामगिरी करत असत, पण त्यांच्या मार्गात अनेक अडथळे येत होते. मात्र २०१४ नंतर भारतीय खेळाडूंना परदेशात सर्वोत्तम प्रशिक्षण, सुविधा आणि स्पर्धात्मक वातावरण मिळत आहे’, असं त्यांनी नमूद केलं.
महिला खेळाडूंचं विशेष कौतुक केलं.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी महिला खेळाडूंचं विशेष कौतुक केलं. ‘महिला खेळाडूंनी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्यांनी देशातील महिलांची ताकद दाखवून दिली. आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या पदकांपैकी निम्मी पदकं महिलांनी जिंकली आहेत’, असं मोदी म्हणाले. क्रीडा मंत्रालयाच्या खेलो इंडिया या कार्यक्रमाचं कौतुक करताना मोदी म्हणाले की, हे एक मोठं यश आहे. ‘या आशियाई क्रीडा स्पर्धेत १२५ खेळाडू खेलो इंडिया कार्यक्रमाचा भाग होते. त्यांनी ४० पदकं जिंकली. खेलो इंडिया योग्य दिशेनं वाटचाल करत असल्याचं यावरून दिसून येते’, असं ते म्हणाले.
खेलो इंडियाचा फायदा झाला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘खेलो इंडिया अंतर्गत तीन हजारांहून अधिक खेळाडूंना प्रशिक्षण आणि आहारविषयक मदत मिळत आहे. ‘खेळाडूंना एकूण २५ हजार कोटी रुपयांची मदत दिली जात आहे. खेळाडूंच्या मार्गात पैसा अडथळा ठरणार नाही. पुढील पाच वर्षांत सरकार खेळाडूंवर अतिरिक्त ३,००० कोटी रुपये खर्च करणार असून आणखी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील’, असं त्यांनी स्पष्ट केलं.