नवी दिल्ली- स्वातंत्र्याची खरी अनुभूती घ्यायची असेल तर आपला ‘स्व’ जाणून घ्यावा लागतो. समाज आणि देश म्हणून आपली ओळख काय, याचा शोध घेतला तरच आपल्यातील सुप्त सामर्थ्याचा शोध पूर्ण होतो. स्वातंत्र्योत्तर भारतात आलेली मरगळ ही या ‘स्व’ च्याविषयी असलेल्या अज्ञानापोटी आणि अनास्थेपोटी होती.आज देशाचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना अवघा देश ऊर्जेने झपाटलेला आहे, याचे प्रमुख कारण या देशातील हे सुप्त सामर्थ्य जागलेले दिसते आहे. सर्व मरगळ झटकून जगाला दिशा देण्याची क्षमता फक्त आपल्यात आहे, ही भावना जागविण्याचे निर्विवाद श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे.
असे म्हटले जाते की, एखादी गोष्ट लोकांना सांगणारा नेता सर्वसाधारण असतो, ती फक्त सांगून न थांबता त्याबाबत स्पष्टता देणारा उत्तम नेत्यात गणला जातो. स्पष्टता देत असताना त्याचा अनुभव देऊ शकणारा नेता गुणवान म्हणून गणला जातो, परंतु निर्विवाद नेता बनण्यासाठी प्रेरणा देण्याचे सामर्थ्य असावे लागते.नरेंद्र मोदी यांनी या देशातील कोट्यवधी लोकांत प्रेरणा निर्माण केलेली आहे. त्यामुळेच ते अव्दितीय आणि निर्विवाद नेताही ठरतात. एका अत्यंत दयनीय आणि तेजोभंग झालेल्या समाजाच्या मनात विश्वास जागविण्याचे आव्हान सर्वात कठीण होते, हे कठीण आव्हान नरेंद्र मोदी यांनी पेलेले आहे.आव्हानांचे डोंगर लिलया पार करणारा आणि कर्तव्याप्रती प्रखर निष्ठा असणारी व्यक्ती निर्विवादपणे समाजाचा नेता असते. ही गुणसंपदा असलेल्या दिग्गज नेत्यांची परंपरा भारताला लाभलेली आहे.
नरेंद्र मोदी या दिग्गज परंपरेचे आजचे सर्वात योग्य वारसदार आहेत.राजकारण आणि समाजकारणातील नरेंद्र मोदी नावाचा ब्रँड आज देश व्यापून आहे. परंपरागत राजकारणाला फाटा देत त्यांनी आपलं राजकारण उभं केलेलं आहे. त्यांचं राजकारण विकासाभिमुख आहे आणि भविष्यवेधीही आहे.
अफाट कार्यमग्नतासामान्य माणसंही असामान्य कामगिरी करतात याचे सर्वात ठळक उदाहरण आपण मोदींच्या रूपात पाहतो आहोत. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा आणि त्यातही सर्वाधिक तरुणाचा असलेल्या या देशासमोर एक स्वप्न ठेवण्याची आवश्यकता होती, ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मनामनात आत्मविश्वास जागवण्याची गरज होती, मोदींनी या देशासमोर विश्वगुरू होण्याचे स्वप्न ठेवले आणि त्यासाठी कोट्यवधी तरुणांना प्रेरित केले.
समाजाच्या मनात प्रेरणा निर्माण करण्यासाठी उत्तम भाषणकलेची जोड पुरेशी नसते, तुमचा संकल्प प्रत्यक्षात साकारण्यासाठी तुम्ही किती दृढ इच्छाशक्तीने काम करता आहात, यालाही मोल असते. पंतप्रधानपदाची नऊ वर्षे उलटून गेलेली आहेत. मोदींना प्रत्येक भारतीय सतत कार्यमग्न असलेला पाहतो आहे.कार्यमग्नता इतकी अफाट आहे की, आराम हा शब्दच त्यांच्या शब्दकोषातून हद्दपार झालेला आहे. अहोरात्र भारतमातेच्या वैभवाचे स्वप्न पाहून मोदीजी निरंतर मार्ग चालताहेत, हे दृश्य सारा देश अनुभवतो आहे. मोदींची ही प्रखर दृढ इच्छाशक्ती कोट्यावधींसाठी प्रेरक ठरत आहे.
महिला सक्षमीकरणाचा ध्यासस्वप्न पाहताना ती किरकोळ आणि छोट्या स्वरूपात आणि, मर्यादित पातळीवर विचार करणं मोदीजींना रुचतच नाही. त्यामुळे त्यांच्या योजनांची झेप थक्क करणारी आहे आणि त्यांचा परीघही अफाट विस्तारलेला आहे. याचे एक उदाहरण चटकन देता येईल.या देशातील सामान्य माणूस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६४ वर्षे बँकिंग व्यवस्थेपासून कित्येक योजने दूर होता. मोदींनी जनधन बँक खाते ही योजना राबवून ५० कोटी अतिसामान्य माणसांना बँकींगशी जोडून घेतले. आज या बँक खात्यांमुळे सामान्य माणसाच्या खात्यात सरकारच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या अनुदानाचे पैसे थेट पोचतात.गेल्या नऊ वर्षात तीस लाख कोटी रुपये सामान्य माणसांच्या खात्यात थेट जमा झाल्याचे आकडेवारी सांगते. ही एकच बाब मोदींच्या विचारांची झेप ठळकपणे दाखवून देते. गरीब कल्याणाची योजना ही फक्त भाषणबाजीपुरती मर्यादित नाही आणि ती प्रत्यक्षात आणायची असेल तर तंत्रज्ञानाची ताकद वापरली पाहिजे, हा परिपूर्ण विचार मोदी यांच्या प्रत्येक निर्णयात दिसतो.महिला सक्षमीकरणाबाबतही यापूर्वी भरपूर परिसंवाद झाले, योजना जाहीर झाल्यात, भाषणे ठोकली गेली परंतु त्याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे कसब मोदींनीच दाखवले.
महिलांचे सक्षमीकरण करताना त्यांची यातनातून मुक्तता केली पाहिजे आणि त्यासाठी काय करायला पाहिजे, याचा विचार प्रत्यक्षात उतरवला पाहिजे, याचे भान जपत मोदी यांनी चुलीच्या धुरातून या महिलांना मुक्त करण्याचा संकल्प केला.या महिलांना ८ कोटी एलपीजी गॅस कनेक्शन देत त्यांनी संकल्प सिद्धीस नेला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ११ कोटी शौचालये बांधून महिलांच्या सन्मानाची बोलकी कृती मोदींकडूनच घडली. पाणी भरून आणण्यासाठी होणारा त्रास महिलांना होतो, त्या यातनातून मुक्त करण्यासाठी हर ‘घर नल, ही जल जीवन मिशन योजना’ राबवीत कोट्यवधी घरात नळ पोचवण्याचा संकल्प मोदींचाच आहे.
अत्यंत जबाबदार पालकमोदींनी भारतीयांच्या मनातील न्यूनगंड जमीनदोस्त करण्याचे काम केले. मोदींना नवतंत्रज्ञानाचे वावडे नाही आणि ते स्वीकारत असतानाच मोदींना देशाच्या प्राचीन सांस्कृतिक वारशाविषयीही कमालीची आस्था आहे. तंत्रज्ञान माणसांमधील अंतर कमी करते, संवाद प्रक्रिया गतीमान करते परंतु तंत्रज्ञाना इतकेच महत्त्व भावनिक बंध आणि सांस्कृतिक घटकांना आहे, हे मोदी यांनी फार लवकर ओळखले.त्यामुळेच यूपीआयचा प्रसार करीत असताना, चांद्रयान सोडत असताना, मंगळाकडे उपग्रह झेपावत असताना अयोध्येत राममंदिराची उभारणी होते, उज्जैनचे महाकाल मंदिर नव्या डौलाने आकार घेते, काशीविश्वेश्वराचा कँरिडाँर साकार होतो, बुद्ध सर्किट जोडले जाते, संसदेच्या नव्या सभागृहात सेंगोल विराजमान होतो.मोदींनी या देशाच्या सांस्कृतिक प्रतिमांशी नव्या आस्थेने सारा समाज जोडला.
त्याला न्यूनगंडातून मुक्त केले. आपल्या सांस्कृतिक वारशाविषयी नागरिक गौरवाने बोलू लागले. कोरोनासारख्या प्रलयंकारी साथीत अवघं जग हादरलेले असताना संपूर्ण भारतीयांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे निर्विवाद श्रेय मोदी यांना आहे.एका अत्यंत जबाबदार पालकाच्या भूमिकेतून त्यांनी कोरोनात जनतेला उघडे पडू दिले नाहीच परंतु दोनशे कोटीहून अधिक लसीकरण करून देशवासीयांना भयमुक्त केले. जगातील अनेक देशांना लस पोचवीत मानवतेचा संस्कार भारतीय संस्कृतीचा मूलाधार असल्याचे दर्शन घडवले.संवाद ही त्यांची ताकदजनतेशी नाळ आणि जनतेशी संवाद, त्यांच्या इतक्या ताकदीने कोणीही करू शकत नाही. हा संवाद लांगूलचालनाचा नाही तर जनतेला देशाच्या विकासात भागीदार बनविणारा आहे. नव नव्या कल्पना मांडत त्या अमलात आणण्यासाठी प्रोत्साहित करीत राहणं हा त्यांचा लोकविलक्षण गुण आहे. ते मुलांशी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून बोलतात, ‘मन की बात’मधून देशातील कोट्यवधी लोकांशी महिन्यातून एकदा संवाद करतात.
संवाद ही त्यांची ताकद आहे. आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यामुळे भारताचे क्षितिज विस्तारत आहे. यामागची ऊर्जा मोदींच्या नेतृत्वातून आलेली आहे. कर्तव्य धर्माशी इमान राखून देशाचे पालकत्व निभावणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्मदिवसांच्या उदंड शुभेच्छा !!!…..