रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्गंमधून नारायण राणेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन करत लीड कमी मिळेल तिथे विकासनिधी कमी मिळाला तर तक्रार करायची नाही असा इशारा भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी मतदारांना केले आहे. महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र त्यापूर्वीच राणे कुटुंबाने इथे प्रचाराला सुरुवात केल्याचे चित्र आहे.
नारायण राणे यांचा विजय पाहिजे म्हणजे पाहिजेच
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये गुरुवारी कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित होते. यावेळी नीतेश राणे बोलत होते. वडिलांच्या प्रचारासाठी थेट मुलगा मैदानात उतरल्याचे यावेळी पाहायला मिळाले. ते म्हणाले की, ”जेव्हा नारायण राणे उमेदवार म्हणून समोर असतील तेव्हा 80 ते 85 टक्के मतदान आपल्याला करायचे आहे. सर्वांचा हिशोब मी घेऊन बसणार आहे. जिथे लीड कमी मिळेल तिथे विकास निधी मिळाला नाही तर तक्रार चालणार नाही. नारायण राणे यांचा विजय मला पाहिजे म्हणजे पाहिजेच” असे नीतेश राणे मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले.
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची लोकांना घाई- नारायण राणे
यावेळी नारायण राणे यांनी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची लोकांना घाई झाल्याचे विधान केले. ते म्हणाले, ”उमेदवार जाहीर होण्याआधी, दिवस कमी राहिल्याने आपण मोदींचे कार्य घेऊन लोकांपर्यंत जात आहोत. मोदींच्या बाजूने वन साईड मतदान करण्याची लोकांना विनंती या मेळाव्यातून करतोय असे राणेंनी सांगितले. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून कधी निवडणूक येते आणि मोदींना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करतो अशी घाई लोकांना झाली”, असे नारायण राणे म्हणाले.
मतदारसंघावर शिंदे गट आणि भाजपकडून दावा
दरम्यान, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे संभाव्य उमेदवार नारायण राणे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. नारायण राणेंनी आता तालुका निहाय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडूनही दावा सांगण्यात येत आहे. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये याबद्दल संभ्रम आहे.
शिंदे गटाकडून किरण सामंत लढण्यास इच्छुक
मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या ठिकाणाहून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र हा मतदारसंघ आता भाजपकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता प्रचाराला लागले आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किरण सामंत यांना अचानक वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले होते. त्यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर त्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे.