
मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अशा ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नवीन पर्वात सेलिब्रिटींबरोबरच राजकीय नेतेही हजेरी लावणार आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाच्या नवीन भागात माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नारायण राणे सहभागी होणार आहेत.
‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात नारायण राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावर भाष्य केलं. नारायण राणेंना या मुलाखतीत “आमदार उचलून आणणे, सरकार पाडणे…त्यावेळी तुमची मास्टरकी झाली होती. आता हेच त्यांच्याबरोबर घडलं. जर तुम्ही आज शिवसेनेत असता तर काय केलं असतं?” असा प्रश्न विचारला गेला.
अवधूत गुप्तेने विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, ‘आम्ही सगळे जाण्याची परिस्थिती यांनीच आणली. मी शिवसेनेत असतो तर सेनेची ही अवस्था झालीच नसती. एक आमदार इकडचा तिकडे जाऊ शकत नव्हता, चाळीस तर सोडाच’.
‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अवधूत गुप्ते करत आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.