मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारचा आज शपथविधी होत आहे. महाराष्ट्रातील 5 नेत्यांना पीएमओमधून मंत्रिपदासाठी कॉल आले आहेत. मात्र, मागील मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या दोन राज्यसभेच्या खासदारांना अजूनपर्यंत फोन आलेला नाही. यात पहिले नाव आहे ते नारायण राणे आणि दुसरे नाव मराठवाड्यतील भागवत कराड यांचे आहे. यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे राज्यसभा खासदार भागवत कराड यांच्याकडे मोदींच्या 2.0 मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तर कोकण विभागातील नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु उद्योग मंत्री होते. देशभरातील मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या उमेदवारांचा लोकसभा निवडणुकीम पराभव झाला आहे. तर दुसरीकडे नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणला आहे.
अनुराग ठाकुरांना संधी नाही..
हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकलेले भाजप नेते अनुराग ठाकूरही एनडीए सरकारमध्ये दिसणार नाहीत. अनुराग ठाकूर यांनी हमीरपूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सतपाल सिंह रायजादा यांचा सुमारे 2 लाख मतांनी पराभव केला आहे. नारायण राणे यांना मंत्रिपदासाठी अजून फोन गेलेला नाही. त्यामुळेही भूवया उंचावल्या आहेत. उदयनराजे भोसले यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती. मात्र, अजून त्यांना फोन आलेला नाही. दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये प्रादेशिक पक्षांना महत्त्व प्राप्त झाल्याने त्यांना सुद्धा मंत्रीपद जाणं अपेक्षित आहेत.
नेते मोदींच्या निवासस्थानी दाखल..
शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदी पंतप्रधान निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची भेट घेत आहेत. या बैठकीत सहभागी होण्यासाठी संभाव्य मंत्र्यांसह भाजपचे नेते पोहोचू लागले आहेत. अमित शाह, जेपी नड्डा, बीएल वर्मा, पंकज चौधरी, शिवराज सिंह चौहान, किरण रिजिजू, जितीन प्रसाद, रवनीत सिंह बिट्टू, अन्नपूर्णा देवी, अर्जुन राम मेघवाल, नित्यानंद राय, अर्जुन मेघवाल असे भाजप नेते पोहोचले आहेत. आरजेडी नेते लल्लन सिंह, रामनाथ ठाकूर, लोजप नेते चिराग पासवान हेही पोहोचले आहेत.