
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात खेळवण्यात आला.
दुबई – आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात दुबई इथं खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघानं 4 विकेटनं विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघानं पाचव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विषेश म्हणजे भारतीय संघानं सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता 5 मार्च रोजी होणाऱ्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघासोबत भारतीय संघ फायनलमध्ये खेळेल. अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळवला जाणार आहे.
कांगारुंची प्रथम फलंदाजी….
या सामन्यात कांगारु कर्णधार स्टीव्ह स्मिथनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ 49.3 षटकांत 264 धावांवर ऑलआउट झाला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथनं सर्वाधिक 73 धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान त्यानं 4 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याच्याशिवाय, ट्रॅव्हिस हेड 33 चेंडूत 39 धावा करुन बाद झाला. तर अॅलेक्स कॅरीनं 57 चेंडूत 61 धावांची खेळी केली. गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
भारताचा 4 विकेटनं विजय…
या सामन्यात कांगारुंनी दिलेल्या 265 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर गिल 8 धावा करुन बाद झाला. रोहित शर्मा 28 धावा करुन बाद झाला. यानंतर, विराट आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. विराट 84 धावा करुन बाद झाला तर श्रेयस अय्यरनं 45 धावांची खेळी केली. शेवटी केएल राहुलनं 34 चेंडूत 42 धावा केल्या, तर हार्दिक पांड्यानं 24 चेंडूत 28 धावांची जलद खेळी करत भारताला मोठा विजय मिळवून दिला.
9 मार्चला अंतिम सामना-…
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आता 9 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. जर टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचली तर अंतिम सामना पाकिस्तानमध्ये होणार नाही, असा निर्णय आयसीसीनं आधीच घेतला होता. पाकिस्तान या स्पर्धेचा यजमान देश असला तरी, बीसीसीआयनं टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. भारतानं त्यांचे तिन्ही लीग सामने दुबईमध्ये खेळले आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा उपांत्य सामनाही याच स्टेडियमवर खेळवण्यात आला.