हरियाणा राज्यात मंगळवारी मोठा राजकीय भूकंप झाला. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नायब सिंह सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
चंदीगड(हरियाणा)- नायब सिंह सैनी हे आता हरियाणाचे नवे मुख्यमत्री (Haryana New CM Nayab Singh Saini) असणार आहेत. नायब सिंह सैनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. मनोहरलाल खट्टर आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्याकडं राजीनामा दिला होता. त्यानंतर नायब सिंह सैनी यांच्याकडं मुख्यमंत्री पद देण्यात आलंय.
नायब सिंह सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री….
लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात राजकीय हालचालींना वेग आलाय. भाजपा आणि जेजेपीची युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री मनोहरलाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मनोहरलाल यांच्या जागी नायब सिंह सैनी यांची नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आलीय.
नायब सैनी कोण आहेत?…
नायब सिंह सैनी यांचा जन्म अंबाला येथील मिझापूर माजरा या छोट्या गावात झाला. नायब सिंह यांचा जन्म 25 जानेवारी 1970 रोजी सैनी कुटुंबात झाला. त्यांनी बीए आणि एलएलबीची पदवी मिळवली आहे. विद्यार्थीदशेत नायब सिंह सैनी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले, जिथं त्यांची मनोहरलाल खट्टर यांच्याशी भेट झाली. काही काळानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. नायब सिंह सैनी हे सुरुवातीपासूनच मनोहरलाल खट्टर यांच्या विश्वासातले कार्यकर्ते होते.
नायब सिंह सैनी यांचा राजकीय प्रवास…
नायब सिंह सैनी हे 2002 मध्ये भाजपाच्या युवा आघाडीच्या अंबाला शाखेचे जिल्हा सरचिटणीस बनले. त्यानंतर 2005 मध्ये ते भाजपाच्या अंबाला युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले. 2009 मध्ये नायब सिंह यांना हरियाणा भाजपाच्या किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस बनवण्यात आलं. 2012 मध्ये त्यांना अंबाला जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष बनवण्यात आलं. यानंतर 2014 साली त्यांनी नारायणगड विधानसभेतून आमदारकीची निवडणूक जिंकली. त्यानंतर 2016 मध्ये त्यांना हरियाणा सरकारमध्ये राज्यमंत्री करण्यात आलं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते कुरुक्षेत्रमधून खासदार म्हणून निवडून आले होते. खासदार झाल्यानंतर त्यांना हरियाणा भाजपा अध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. आता 12 मार्च 2024 रोजी त्यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आलीय.