दुहेरी हत्याकांडानं नागपूर हादरलं; मुलाने आई-वडिलांना संपवलं; पोटचा मुलगा उठला जन्मदात्यांच्या जीवावर…

Spread the love

नागपूर- नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरलं आहे. नागपूर शहरातील कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घ़डली आहे. एका इंजिनीअर तरुणाने आपल्या आई वडिलांची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून आई वडिलांची हत्या करण्यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लीलाधर डाखोडे आणि अरुणा डाखोडे असं हत्या झालेल्या दाम्पत्याचं नाव असून मुलगा उत्कर्ष असे आरोपीचे नाव आहे. ही घटना २६ डिसेंबरला आरोपीने आई-वडिलांची हत्या केली होती. लीलाधर डाखोडे कोराडी पॉवर प्लांटमध्ये टेक्निशन होते. तर अरुणा या शिक्षिका होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपी उत्कर्ष हा ६ वर्षांपासून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. त्याला वारंवार अपयश येत असल्याने त्याच्या पालकांनी उत्कर्षला अभ्यास सोडून शेती करण्याचा सल्ला देत होते. पण उत्कर्ष अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करण्यावर ठाम होता.

त्यातच त्याला एमडी ड्रग्जचे व्यसन होते आणि या व्यसनामुळे त्याचे अभ्यासात मन लागत नव्हते. आई-वडिलांच्या सततच्या टोमण्यांना कंटाळून त्याने आई-वडिलांची हत्या करण्याचा प्लॅन आखला. मिळालेल्या माहितीनुसार, उत्कर्षने २६ डिसेंबरला सकाळी धाकटी बहीण सेजल हिला कॉलेजला सोडले. सेजल बीएमएसचे शिक्षण घेत होती. उत्कर्षने बहिणीला कॉलेजला सोडल्यानंतर खासाळ येथील आपल्या घरी पोहोचला आणि दुपारी एक वाजताच्या सुमारास आधी आई अरुणाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी वडिलांची घरी येण्याची वाट पाहू लागला. ५ वाजताच्या सुमारास वडील घरी आल्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.

दोन्ही हत्या केल्यानंतर आरोपीने घराला कुलूप लावून वडिलांची गाडी आणि मोबाईल फोन कोराडी येथे राहणाऱ्या मामाकडे नेला आणि तेथून आपल्या बहिणीला फोन करून सांगितले की आई-वडील मेडिटेशनकरता बंगलोरला गेले आहेत. आरोपीने तिला काकाच्या घरी सोडून दिलं. या सात दिवसांमध्ये आरोपी उत्कर्षनं बहिणीला तिच्या घरी जाऊ दिलं नाही. त्यामुळं हे हत्याकांड उघडकीस येण्यास उशीर झाला. शेजाऱ्यांना खोलीतून उग्र वास येऊ लागल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेस केला असता दाम्पत्याचे मृतदेह जमिनीवर पडलेले दिसले. प्राथमिक तपासादरम्यानच खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यामुळे पोलिसांनी उत्कर्षला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता,त्याने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी उत्कर्षला अटक केली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page