गुरुवर्य रविंद्रनाथ टागोर यांच्या भित्तीचित्राचे जिल्हा न्यायालयात अनावरण…

Spread the love

समृध्द जीवनासाठी गुरुदेवांचे स्मृतीशिल्प प्रेरणादायी: न्यायमूर्ती भूषण गवई

रत्नागिरी(जिमाका) : गुरुदेव रविंद्रनाथ टागोर हे बहुआयामी व्यक्तीमत्व होते. त्यांच्या भित्तीचित्राचे स्मृतीशिल्प प्रेरणा देणारे ठरेल. त्यांच्या विचारांचे अनुकरण आणि प्रेरणा घेऊन जीवन समृध्द होईल, असे विचार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मांडले. येथील जिल्हा न्यायालयात गुरुवर्य रविंद्रनाथ टागोर यांच्या भित्तीचित्राचे अनावरण न्यायमूर्ती श्री. गवई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय, उद्योगमंत्री उदय सामंत, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी, महाराष्ट्र, गोवा बार कौन्सीलचे अध्यक्ष विवेक घाटगे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सीलचे सदस्य संग्राम देसाई आदी उपस्थित होते.

न्यायमूर्ती श्री. गवई म्हणाले, रत्नांची खाण असणाऱ्या जिल्ह्यात गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांचे आयसीएस असणारे बंधू सत्येंद्रनाथ टागोर हे येथे जिल्हा न्यायाधीश होते. या कालावधीत गुरुदेव टागोरांनी याठिकाणी काव्य लेखन केले. आठव्या वर्षी त्यांनी कविता करायला सुरुवात केली. सोळाव्या वर्षी त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला. कवी मनाच्या टागोरांनी शेक्सपिअरच्या साहित्याचे अध्ययन केले. मुक्त शिक्षणाची संकल्पना आणून शांतीनिकेतन सुरु केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना समिती समोरील भाषणे वाचली, तर देशाची घटना काय आहे, याची कल्पना येईल. बाबासाहेबांची या देशाकरिता, नागरिकांकरिता काय तळमळ होती, हे या भाषणांतून दिसून येते. सर्वसामान्य जनतेला राजकीय बरोबर, आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळायला हवा, हे त्यांचे ब्रीद होते, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ हवे

हर्बर लिंकमुळे पुण्याचा माणूस मुंबईला दोन तासात जाऊ शकतो. परंतु, चंदगडसारख्या टोकाच्या तालुक्यातील तसेच कर्नाटक सीमेवरील गावांतील व्यक्ती मुंबईला इतका प्रवास करुन जाणं, हे अत्यंत खर्चिक आहे. त्याचा वेळ आणि खर्च वाचविण्यासाठी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हायला हवे. त्याबाबत उच्च न्यायालय सकारात्मक विचार करेल, असेही ते म्हणाले.
न्यायमूर्ती श्री. उपाध्याय म्हणाले, आजचा हा सोहळा ऐतिहासिक आहे. कोकणभूमी ही पवित्र भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांची ही भूमी वीर सावरकरांची आठवण करुन देणारी कोकण भूमी आहे. देशाचे आयकॉन असणारे गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी काही काळ याठिकाणी वास्तव्य केले. आपल्या देशाचे आणि बांग्लादेशाचे राष्ट्रगीत त्यांनी लिहीले. ‘विपत्तीमध्ये तू माझं रक्षण करं, ही माझी प्रार्थना नाही, विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये, एवढीच माझी इच्छा’, अशी प्रार्थना गुरुदेवांनी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वाचलं तर चांगले आणि चांगले काम कसे करावे, हे शिकायला मिळते, असेही ते म्हणाले.

उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, रत्नागिरीकरांसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. मंडणगड येथील कामकाजाला आणि इथल्या कार्याला निधी देण्याचे भाग्य मला मिळाले, त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. न्याय व्यवस्था नम्र असते, हे देशाच्या न्याय व्यवस्थेने दाखवून दिले आहे. बार कौन्सीलसाठी आवश्यक असणाऱ्या जागेसाठी शासनस्तरावर निश्चित प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले.
बहुआयामी व्यक्तीमत्व गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांचे हे शिल्प प्रेरणा देणारे आहे, ते सदैव प्रेरणा देत राहील, असे विचार पालक न्यायमूर्ती श्री. जामदार यांनी व्यक्त केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक करुन पार्श्वभूमी सांगितली.
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सीलचे अध्यक्ष श्री. घाटगे, सदस्य श्री. देसाई, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दिलीप धारिया यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक आर. एन .जोशी, माजी न्यायमूर्ती पी.आर. बोरा, प्रबंधक निरिक्षक ए. डी. बिले, माजी न्यायाधीश एम.डी. केसरकर, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदीसंह वकील उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page