मोनू मनेसरच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे गुरुग्राममध्ये हिंसाचार उफाळला?

Spread the love

यात्रेपूर्वी नेमकं काय घडलं?
नुहमधील यात्रेपूर्वी मोनू मनेसरनं आपल्या Whatsapp स्टेटसवर एक व्हिडीओ शेअर केला?

नुहमधील हिंसाचारासाठी मोनू मनेसरचा व्हिडीओ कारणीभूत?

मणिपूर- एकीकडे देशभरात आणि देशाच्या संसदेतही मणिपूरमध्ये चालू असणाऱ्या हिंसाचारावर दररोज चर्चा झडत असताना दुसरीकडे हरियाणामध्येही हिंसाचाराच्या घटना घडताना दिसत आहेत. सोमवारी हरियाणामध्ये एका यात्रेदरम्यान हिंसाराच होऊन तीन जणांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठा मध्यरात्री एका प्रार्थनास्थळाला आग लावण्याचा प्रयत्न जमावाकडून करण्यात आला. यावेळी करण्यात आलेल्या हल्ल्यात नायम इमाम यांची धारधार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर गुरुग्रामधील वातावरण तणावपूर्ण झालेलं असताना आता नेमकं यात्रेमध्ये हिंसाचार का झाला? यासंदर्भात नवीन माहिती समोर येत आहे.

नेमकं काय घडलं?

सोमवारी हरियाणातील नुह भागात ब्रिजमंडळ जलाभिषेक यात्रा काढण्यात आली. बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून ही यात्रा काढण्यात आल्याचं सांगितलं जातं. या यात्रेदरम्यान दोन गटांमध्ये हिंसाचार उफाळला व तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन होम गार्ड्सचाही समावेश होता. या यात्रेनंतर सोमवारी मध्यरात्री हरियाणाच्या गुरुग्राममधील सेक्टर ५७ मध्ये असणाऱ्या एका प्रार्थनास्थळाला आग लावण्याचा प्रकार घडला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली. या सगळ्या प्रकारानंतर गुरुग्राम व नुहमधील परस्थिती तणावपूर्ण झाली आहे. नुहमधील परिसरात काही काळ इंटरनेटही बंद करण्यात आलं.

“शस्त्र आणणार नाही”, अश्वासनानंतरही यात्रेत शस्त्र कशी?

दरम्यान, या यात्रेच्या आधी नुह पोलीस, जिल्हा प्रशासन, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व जमियत उलेमा-इ-हिंदच्या प्रतिनिधींनी एक सविस्तर बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये यात्रेत कोणत्याही प्रकारची शस्त्र आणली जाणार नाहीत, या आश्वासनानंतरच यात्रेला परवानगी देण्यात आली होती, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत पनवर यांनी दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ही यात्रा होत असून आमचा विरोध फक्त शस्त्रांच्या वापराला आहे, अशी प्रतिक्रिया जमियत उलेमा-इ-हिंदचे सदस्य मौलाना याहिया करीमी यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

एका व्हिडीओमुळे वातावरण बिघडलं!

दरम्यान, यात्रेत शस्त्र आणणार नसल्याचं आश्वासन संबंधितांनी दिलं. पोलिसांनी त्यावर यात्रेला परवानगी दिली. सर्वकाही सुरळीत असताना मोनू मनेसर उर्फ मोहित यादव या स्वयंघोषित गोरक्षकानं २९ जुलै रोजी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये तो यात्रेत सहभागी होणार असल्याचं सांगतोय. “मी स्वत: यात्रेत सहभागी होणार आहे. माझी पूर्ण टीम यात्रेत उपस्थित असेल”, असं मोनू या व्हिडीओत सांगताना दिसून आला.
भिवनी परिसरात जुनैद आणि नासिर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी असणाऱ्या मोनू मनेसरनं हा व्हिडीओ टाकल्यानंतर परिस्थिती चिघळल्याचं सांगितलं जात आहे. “मोनूवर जुनैद आणि नासिरची हत्या केल्याचा आरोप आहे. अशा वेळी आपण मेवातला येत असल्याचं तो असं सांगतोय जणूकाही त्यानं काहीच फरक पडणार नाही”, अशी प्रतिक्रिया जमियतचे दुसरे सदस्य मुफ्ती सलीम साकरस यांनी दिली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतप्त भावना उमटल्याचंही ते म्हणाले.

बजरंग दलाकडून मोनूचं समर्थन

दरम्यान, बजरंग दलानं मात्र मोनूचं समर्थन केलं आहे. “मोनूनं फक्त एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामुळे लोकांचा संताप कशाला व्हायला हवा? ही यात्रा विहिंप किंवा बजरंग दलाची नाही. ही यात्रा हिंदू समुदायाबाबत आहे”, अशी प्रतिक्रिया गुरुग्राममधील बजरंग दलाचे सदस्य अमित हिंदू यांनी दिली आहे. दरम्यान, शेवटी मनू मनेसर या यात्रेत सहभागी झालाच नाही. नंतर इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये मनू मनेसरनं बजरंग दल व विहिंपनं आपल्याला यात्रेत सहभागी होऊ नकोस असं सांगितल्याची प्रतिक्रिया दिली.

१७ FIR, १००हून अधिक ताब्यात

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत १७ गुन्हे दाखल केले असून १०० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. “काही स्थानिकांकडेही बंदुका होत्या. काठ्या आणि तलवारी होत्या. आम्ही या भागातील बंदुकांच्या परवान्यांची तपासणी करत आहोत. त्यानुसार कारवाई करण्यात येईल”, अशी माहिती भिवानीचे पोलीस अधीक्षक नरेंदर बिजार्निया यांनी दिली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page