
रत्नागिरी :- शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयासमोरील रस्त्याची चाळण झाली आहे . रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेला धारेवर धरले . चार दिवसात रस्त्याची दुरुस्ती न केल्यास मनसे रस्त्यावर उतरेल , असा इशारा देण्यात आला आहे .
मनसेचे तालुका संघटक सतीश खामकर , उपतालुका संघटक प्रशांत कुडाळकर व शहर संघटक सुशांत घडशी यांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले आहे . या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना चालताही येत नाही . तसेच खड्ड्यात साचलेले पाणी वाहन जाताच विद्यार्थ्यांच्या अंगावर उडत आहे . या रस्त्याच्या कामावर लाखो रुपये खर्च करण्यात आले , हे पैसे नेमके कोठे खर्च झाले , असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे . या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे .