चिपळूणला पुन्हा क्रीडा वैभव मिळवून देऊ आणि इथली मुलं विविध क्रीडा प्रकारातून देशाचे नेतृत्व कसं करतील, याकडे लक्ष देऊ, अशी भावना शालेय स्तरीय लेदर बॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केली.
चिपळूण/ प्रतिनिधी- चिपळुणातील क्रीडा क्षेत्राला गती देण्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न राहातील. पवन तलाव मैदान सुसज्ज करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तीन लेदरच्या विकेट तयार होत आहेत. प्रेक्षक गॅलरी होत आहे. अजून खूप काम बाकी आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू यावेत, अशा पद्धतीने आपण हे मैदान उभं करू. निधीची काळजी करू नका. गोवळकोट, उक्ताड, पेठमाप ही मैदानेही सज्ज होत आहेत. पाग येथे छोटे इनडोअर मैदान तयार करण्याचा आपला प्रयत्न असेल. चिपळूणला पुन्हा क्रीडा वैभव मिळवून देऊ आणि इथली मुलं विविध क्रीडा प्रकारातून देशाचे नेतृत्व कसं करतील, याकडे लक्ष देऊ, अशी भावना आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केली.
चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्यावतीने 16 वर्षाखालील शालेयस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पवन तलाव मैदान येथे सकाळी नऊ वाजता आमदार शेखर निकम यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. या वेळी चिपळूण नगर पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, लायन्स क्लबच्या शमिना परकार, अनिरुद्ध निकम, नाना महाडिक, महेश वाजे, जिल्हा बँकेच्या संचालिका दिशा दाभोळकर, समीर काझी, डॉ. राकेश चाळके, उदय उतारी, अभिजीत पाटील, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर आदी उपस्थित होते.
आमदार शेखर निकम, मुख्याधिकारी विशाल भोसले व अन्य मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. या वेळी प्रास्ताविक करताना अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी सलग तीन वर्षे ही स्पर्धा आपण घेत आहोत. शालेय स्तरावरच लेदर बॉलविषयी आवड निर्माण होत असून अनेक शाळा याकडे वळल्या आहेत. गेल्या वर्षी आठ शाळा सहभागी झाल्या होत्या. यंदा उत्स्फूर्तपणे 12 शाळांनी सहभाग नोंदवल्याचे श्री. दाभोळकर यांनी टाळ्यांच्या कडकडाट सांगितले. येत्या दोन महिन्यात राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा असोसिएशनच्यावतीने आयोजित केली जाणार आहे. आमदार शेखर निकम यांच्यासह सर्वांनी या स्पर्धेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पवन तलाव मैदान सुसज्ज होत आहे, मात्र त्याचा मेंटेनन्स राखणे गरजेचे आहे. नगर पालिकेने है मैदान असोसिएशनच्या ताब्यात द्यावं. आम्ही जीवापेक्षा ते सांभाळू. या ठिकाणी अंडरग्राउंड पाण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणीही दशरथ दाभोळकर यांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे केली. या वेळी आमदार म्हणून दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल शेखर निकम यांचा असोसिएशनच्यावतीने सत्कार करण्यात आला. आमदार झाल्यानंतर त्यांचा हा पहिला सत्कार ठरला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया येथून कृषि विषयातील पदवी प्राप्त करणाऱ्या अनिरुद्ध निकम यांचाही या वेळी खास सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर शाहीद खेरटकर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी असोसिएशनचे पदाधिकारी समालोचक सचिन कुलकर्णी, सचिव राजेश सुतार, सुयोग चव्हाण, सुनिल रेडीज, योगेश बांडागळे, दादा लकडे, पंच गोट्या भोसले, प्रशिक्षक उदय काणेकर, लतीप परकार, प्रसाद देवरुखकर, दिनू माटे आदी विशेष परिश्रम घेत आहेत.