मा. आमदार बाळासाहेब माने यांची लोकसभा सह-प्रभारीपदी निवड…

Spread the love

भाजपाची घोषणा; १५ जानेवारीला परशुराम मंदिरातून अभियानाला प्रारंभ होणार.

रत्नागिरी | जानेवारी १३, २०२४.

भाजपाचे ‘महाविजय २०२४’ अभियान देशभरात सुरू आहे. भाजपाने महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी तयारी सुरू केली असून त्यादृष्टीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात रत्नागिरी विधानसभा निवडणूक प्रमुख, मा. आमदार बाळ माने यांना बढती मिळाली असून आता ते या अभियानाचे लोकसभा सह-प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. येत्या १५ जानेवारीला मकरसंक्रांतीच्या दिवशी भगवान परशुरामाचे दर्शन घेऊन या अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. प्रत्येक गाव, बूथवर दौरा करून १८ फेब्रुवारीला राजापूरमधील धूतपापेश्वर मंदिरात या प्रवासाची इतिश्री होईल. लोकसभा प्रभारी, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा संयोजक, निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांच्यासमवेत जबाबदार पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन हा झंझावाती दौरा होणार आहे.

२०२४ मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी पुढील महिनाभर हा प्रवास सुरू राहील. भाजपाने २०१४ मध्ये २८३ जागा व २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकून केंद्रात सत्ता स्थापन केली. आता ४०४ चा टप्पा पार करून अभूतपूर्व यश मिळवण्यासाठी भाजपा सज्ज झाली आहे. पहिल्या टप्प्यात लोकसभा प्रवास योजनेत देशभरातले कधीही न लढवलेले १५६ मतदारसंघ निवडले. यातील काही जागा मित्रपक्षांना दिल्या होत्या. या ठिकाणी लक्ष्य केंद्रित केले. त्यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघही येतो. त्यानुसार लोकसभा प्रभारी – समन्वयक म्हणून अतुल काळसेकर व लोकसभा संयोजक तथा निवडणूक प्रमुख म्हणून प्रमोद जठार यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनीही या मतदारसंघात चांगलेच लक्ष घातले आहे.

आता महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघात भाजपाने विशेष लक्ष दिले आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी लोकसभा सहप्रभारी म्हणून बाळ माने यांच्या नावाची घोषणा केली. तसेच अन्य कार्यकारिणीही घोषित केली. यामध्ये मंडल अध्यक्ष, प्रमुख, तालुकाध्यक्ष आदी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची सहसंयोजक म्हणून निवड केली आहे. ३८ प्रकारचे विभाग केले असून त्याअंतर्गत समित्या बनवल्या आहेत. लोकसभा जिंकण्यासाठी या समित्यांचे काम सुरू होणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ फुलणार…

मा. आमदार, मा. जिल्हाध्यक्ष असलेले बाळ माने यांच्याकडे लोकसभा प्रवास योजना सुरू झाल्यानंतर रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली गेली आहे. मंडणगड ते राजापूरपर्यंत त्यांचा नियमित प्रवास व कार्यकर्ता जोडलेला आहे. जनसामान्यांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. त्यांच्या कार्यकाळात २०१७ मध्ये भाजपाने ५५ जि. प. गट आणि ११० पं. स. समिती गणात निवडणूक लढवली तेव्हा चिपळूण, संगमेश्वर मतदारसंघात मताधिक्य दिसून आले. चिपळूण नगरपालिका, देवरुख नगरपंचायतीत भाजपाने सत्ता मिळवली. येथे ३४ हजार मते, रत्नागिरीमध्ये ५० हजार मते आणि राजापूरमध्ये २५ हजार मते आहेत. तसेच गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा म्हणून खास मतदार तयार होत आहे. हा मतदार सुमारे २५ टक्के वाढेल, असा भाजपाचा होरा आहे. सिंधुदुर्गमध्ये भाजपाची ताकद मागील काही वर्षांत कमालीची वाढली आहे.

महाविजय २०२४ साठी भाजपाची टीम अशी –

केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, लोकसभा प्रभारी – समन्वयक – अतुल काळसेकर, सहप्रभारी बाळ माने, लोकसभा संयोजक – निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, सहसंयोजक – राजेश सावंत, प्रभाकर सावंत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page