
रत्नागिरी- सार्वजनिक बांधकाम खाते उत्तर रत्नागिरी,राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी आणि औद्योगिक विकास महामंडळ रत्नागिरी यांनी संगनमताने डांबर कामे न करता खोटी बिले वापरून ठेकेदाराला कोट्यवधींचे खोटे पेमेंट केले आहे.
याबाबत संबधित खात्याच्या कार्यकारी अभियंता व लेखापाल यांनी दोषींवर एफआयआर दाखल करावा असा शासन निर्णय असताना अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही.
याबाबत आम्ही पोलीस ठाणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज केले मात्र, त्यांनीही या अर्जावर मौन बाळगल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर आणि अशोक नाचणकर यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार भास्कर जाधव यांच्याकडे केली आहे.
माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर आणि अशोक नाचणकर यांनी आमदार भास्कर जाधव यांची चिपळूण येथे भेट घेतली.यावेळी त्यांनी एक निवेदनही सादर केले आहे.
या निवेदनात आम्ही केलेल्या तक्रार अर्जावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एफआयआर दाखल करावा यासाठी आपण सूचना द्याव्यात अशी मागणी मिलिंद कीर आणि अशोक नाचणकर यांनी भास्कर जाधव यांच्याकडे केली आहे. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी आपण पुर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी उभे राहू असे आश्वासन दिले.